४६ कोटींचा साखर घोटाळा, परळीतून वैद्यनाथ बँकेचा अधिकारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 12:41 PM2021-09-03T12:41:02+5:302021-09-03T12:41:32+5:30
साखर घोटाळाप्रकरणी १२ मार्च २०२१ रोजी कळंब ठाण्यात शंभू महादेव कारखान्याचा चेअरमन दिलीप आपेटसह ४० जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता.
बीड: शंभू महादेव साखर कारखान्याच्या कथित ४६ कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्यात सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी येथून वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना ताब्यात घेतले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील बँक अधिकाऱ्याच्या अटकेने राजकीय व सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हावरगाव (ता.कळंब) येथील शंभू महादेव साखर कारखान्याने परळी येथील वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या ४६ कोटी रुपयांच्या साखर घोटाळाप्रकरणी १२ मार्च २०२१ रोजी कळंब ठाण्यात शंभू महादेव कारखान्याचा चेअरमन दिलीप आपेटसह ४० जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास आहे. आतापर्यंत केवळ दोघांना पकडण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले. २ सप्टेंबर रोजी परळी येथून वैद्यनाथ बँकेचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळेंना ताब्यात घेतले.
काय आहे प्रकरण ?
शंभू महादेव साखर कारखान्याने २००२ ते २०१७ ४७ कोटी २३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. १५४१७७ एवढे साखरेचे पोते (तारण साखर साठा) असल्याचे भासवून दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेस तारण म्हणून साखर साठा ठेवल्याचे दाखवले. तारण असलेल्या साखरेचे गोदाम दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. या बँकेने सील केले होते. यात अफरातफर झाली होती.