नुकसान भरपाईपोटी १४४ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:31 AM2019-11-20T00:31:59+5:302019-11-20T00:32:22+5:30
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाकडून १४४ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यास प्राप्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाकडून १४४ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वर्ग करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५९ शेतक-यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पेरणी झालेल्या ७ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रमुख्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मका, यासह इतर फळबाग केळी, पपई, मोसंबी यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व पिकाच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून जलद गतिने करण्यात आले होते. यामध्ये महसूल, कृषी व जि.प. कर्मचा-यांचा समावेश आहे. नुकसानीचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त होताच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी नुकसानभरपाईसाठी ५०१४ कोटी ८१ लक्ष रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. त्यानूसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १४४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच हा सर्व निधी तालुकास्तरावर वर्ग करण्यात आला असून हा निधी शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे. दरम्यान शेतक-यांच्या खात्यावर नुकसानभरपाई निधी तात्काळ जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत.
अतिवृष्टी बाधित शेतक-यांना २ हेक्टरच्या सरासरी नुकसानभरपाई निधी मिळणार आहे. यामध्ये हेक्टरी ८ हजार रुपये तर फळबागांसाठी १८ हजार रुपये अशी नुकसानभरपाई रक्कम मिळणार आहे. मिळणारी ही रक्कम अतिशय तुटपुंजी असून, सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.
शेतक-यांना विमा तसेच वाढीव नुकसान भरपाई द्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाभरात रस्त्यावर उतरेल, असे देखील करपे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.