गुन्ह्यातील फरार ५ आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:31 AM2021-02-14T04:31:48+5:302021-02-14T04:31:48+5:30
बीड: पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी यांंच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपी जेरबंद करण्याची मोहीम सुरू आहे. दरम्यान, या अंतर्गत विविध गुन्ह्यांत ...
बीड: पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी यांंच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपी जेरबंद करण्याची मोहीम सुरू आहे. दरम्यान, या अंतर्गत विविध गुन्ह्यांत फरार असलेले ५ आरोपी अटक करण्यात आले आहेत. यापैकी एक आरोपी ११ गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. ९ फेब्रुवारीपासून फरार आरोपींचे शोधकार्य स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते. या दरम्यान, त्यांनी पिण्या उर्फ संतोष बाबू भोसले (रा. लोणगांव ता.माजलगाव) याला सोनपेठ येथून अटक केली आहे. त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केलेली आहे. मझहर उर्फ काल्या उर्फ हाफ मर्डर शेख रहीम (रा. बांगरनाला बीड), शेख बब्बर शेख युसुफ (रा.खासबाग बीड) यांना शुक्रवारी पुणे व केज तालुक्यातील बनसारोळा येथून ताब्यात घेतले. त्यांच्यावर बालेपीर येथे झालेल्या शिक्षक खुनाचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे. चौथा आरोपी संपत आबासाहेब गवते (रा.राजापुर ता.गेवराई) याला पुण्यावरून पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पाचवा आरोपी दीपक गौतम पवार (रा.टाकळीअंबड ता.पैठण) यालाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून, त्याच्यावर जालना, औरंगाबाद, बीड येथे दरोडे, जबरी चोरी, खून, लुटमार यांसारखे अकरा गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पोनि भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सोपनि विजय गोसावी यांच्या पथकाने केली.
फरार आरोपींसाठी शोध मोहीम
विशेष पोलीस महानिरिक्षकांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये फरार व स्टँडिंग वॉरंटवरील आरोपींची संख्या जास्त असल्याची बाब समोर आली होती. दरम्यान, त्यामुळे पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी फरार आरोपी ताब्यात घेण्याची १५ दिवसांची मोहीम आखली आहे. हे आरोपी स्थानिक संबंधित बीट अंमलदार यांच्यामार्फत पोलीस पाटलांच्या मदतीने या आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. यामध्ये सर्व पोलीस ठाण्यांतर्गत २,०५४ आरोपी पाहिजे आहेत, तर ११९ फरार व ८२ स्टँडिंग वॉरंटमधील आहेत. लवकरात लवकर आरोपी पकडण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, जे पोलीस कर्मचारी किंवा पोलीस पाटील व नागरिक आरोपी पकडण्यास मदत करतील, त्यांना बक्षीसही दिले जाणार आहे. त्यामुळे आरोपी पकडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.