दुष्काळप्रश्नी महिलांचे ५ तास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:52 PM2018-12-28T23:52:18+5:302018-12-28T23:53:03+5:30
दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळावे तसेच इतर मागण्यांसाठी ३०० महिलांनी येथील तहसील कार्यालयासमोर ५ तास आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळावे तसेच इतर मागण्यांसाठी ३०० महिलांनी येथील तहसील कार्यालयासमोर ५ तास आंदोलन केले. १५ दिवसांपूर्वी आंदोलन करुनही काम मिळत नसल्याने राज्य शेतमजूर युनियनने या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलन सुरू असताना तहसीलदारांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. सायंकाळी साडे पाच वाजता १५ दिवसात काम उपलब्ध करुन देण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
ग्रामीण भाग व शहरात मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, २०१६-१७ मध्ये नगरपालिकेंतर्गत काम केलेल्या मजुरांची मजुरी द्यावी, मजुरांना नमुना क्र. ५ ची पावती देण्यात यावी, अनेक मजूरांना जॉबकार्ड उपलब्ध करुन द्यावे, ग्रामीण भागातील कोथींबीरवाडी, हसनाबाद, रुई, मैंदवाडी, चोरांबा, अंजनडोह येथील ग्रामसेवक व बीडीओ कामाकडे दुर्लक्ष करून मजुरांना दडपशाही करीत असल्याने कार्यवाही करावी या मागण्यांसाठी धारुर तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व कॉ. सोपान भुंबे, कॉ. मनीषा करपे, कॉ. दत्ता डाके, कॉ. काशीराम सिरसट, कॉ. मीरा लांडगे, कॉ. वृंदावणी धोत्रे, शिवकन्या गोंदणे आदींनी केले.
आंदोलनकर्ते राहिले ठाम
आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.
सदरील अनुभव लक्षात घेत यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी तहसीलदार कार्यालयात होते. पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर चार वाजता त्यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून निवेदन स्वीकारले.
मात्र, आंदोलनकर्ते लेखी आश्वासनावर ठाम होते. त्यामुळे पुन्हा दीड तास आंदोलन
सुरुच होते.
तहसीलदार पवार यांनी सायंकाळी साडेपाच वाजता लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.