फ्लॅट विक्रीत ५ लाखांचा गंडा; सहायक नगररचनाकार गजाआड; बिल्डर फरारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:15 AM2019-07-19T00:15:37+5:302019-07-19T00:16:17+5:30
फ्लॅट ताब्यात देण्यासाठी ५ लाख रुपये घेऊनही ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार सहाय्यक नगररचनाकारास गुरुवारी अटक केली आहे. तर बिल्डर अद्याप फरार आहे.
बीड : फ्लॅट ताब्यात देण्यासाठी ५ लाख रुपये घेऊनही ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार सहाय्यक नगररचनाकारास गुरुवारी अटक केली आहे. तर बिल्डर अद्याप फरार आहे.
शहरातील रहिवासी सय्यद रहेमतुल्ला हे औरंगाबाद विमानतळवर शासकीय नोकर आहेत. निवृत्त झाल्यानंतर बीड शहरात घर असावे यासाठी त्यांनी २०१५ साली झमझम कॉलनीमध्ये फ्लॅट घेण्याचे ठरवले. यासाठी उमर मुश्ताक फारोखी या बिल्डरला ५ लाख रुपये दिले. तसेच कायदेशीररित्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन करार केला. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फ्लॅटचा ताबा देण्याची मागणी त्यांनी फारोखी यांच्याकडे केली. मात्र, त्याने फ्लॅट व पैसे देण्यास नकार दिला. खरेदीत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी २९ जून रोजी बीड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल दाखल झाला.
ज्या ठिकाणी फ्लॅट घेतला होता, त्या साईटचे क्षेत्रफळ ९५७.१२ चौरस मीटर एवढे होते. मात्र, अटक केलेला सहाय्यक नगररचनाकार अधिकारी एजाज खान याने आर्थिक संगनमत करुन १०७५ मीटर क्षेत्रफळाचा पीटीआर दिला होता. यामुळे त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केला होता. मागील १५ दिवसांपासून आरोपींचा शोध सुरु होता. दरम्यान बुधवारी रात्री खबऱ्यामार्फत शहर ठाण्यातील पोलिसांना माहिती मिळाली. यावेळी आझादनगर परिसरातील एजाज खान याच्या घरी जाऊन पाहणी केली व अटक केली. ही कारवाई सहाय्यक पो.नि. पवार, उडाणशिव, गव्हाणे, डीबी पथकातील पठाण, असलम शेख यांनी केली.