बीडमध्ये श्रावणात यंदा ५० लाख नारळांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:37 AM2021-09-05T04:37:39+5:302021-09-05T04:37:39+5:30

अनिल भंडारी बीड : यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने, पोळा साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे नारळाची विक्रीही ...

5 million coconuts sold in Shravan in Beed this year | बीडमध्ये श्रावणात यंदा ५० लाख नारळांची विक्री

बीडमध्ये श्रावणात यंदा ५० लाख नारळांची विक्री

Next

अनिल भंडारी

बीड : यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने, पोळा साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे नारळाची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा जिल्ह्यात आषाढ ते श्रावणात जवळपास ५० लाख नारळांची विक्री झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

पावसाळी हंगाम सुरू झाल्यानंतर, आषाढात पालखी सोहळा, दिंड्या पंढरपूरकडे जातात. यावेळी नारळांना मागणी कमीच असते. यंदा तर पालखी सोहळाही झाला नाही, परंतु श्रावणात सोमवार, व्रत, धार्मिक कार्यक्रम, सप्ताह, सणावारामुळे नारळची मोठी मागणी असते. यावेळी श्रावणात पाच सोमवार आहेत, तसेच रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि पोळा या सण उत्सवांमुळे आणि समाधानकारक पावसामुळे यंदा बीड जिल्ह्यात आषाढ ते श्रावणात जवळपास ५० लाख नारळांची विक्री झाली. सर्जा राजाचा मानाचा सण साजरा करण्यासाठी दोन दिवसांपासून शहरातील दुकानांवर विविध साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

गतवर्षी होता बाजार विस्कळीत

२०१९ मध्ये पोळ्याच्या वेळी दुष्काळी सावट होते, तर २०२० मध्ये कोरोनामुळे बाजारपेठेवर निर्बंध होते. त्यामुळे नारळाचा व्यापार विस्कळीत झाला होता. या संधीचा काही व्यापाऱ्यांनी फायदा घेत १० रुपयांचे नारळ २५ रुपयांपर्यंत विकले होते. सध्या जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे.

वाहतूक खर्चात वाढ

तामिळनाडू, आंध्र प्रदेशातून नारळाची आवक बीड जिल्ह्यात होते. वाहतूक दरवाढीमुळे शेकडा पन्नास रुपये खर्च वाढला आहे, तर गतवर्षीच्या तुलनेत नारळ विक्रीत जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली आहे.

पोळ्यासाठी लहान नारळाला मागणी

सध्या ठोक बाजारात लहान नारळाचे भाव १,०५० ते १,१०० रुपये आहे. १२ ते १३ रुपयांना किरकोळ विक्री होते. या नारळाला पोळ्याच्या वेळी जास्त मागणी असते. मध्यम नारळाचे भाव ठोक बाजारात १,२५० ते १,३०० रुपये असून, किरकोळ विक्री १५ रुपये आहे. मोठ्या आकाराचा नारळ १,४०० रुपये शेकडा असून, १८ ते २० रुपयांना विकला जातो.

श्रावणात दोन रुपयांची वाढ

श्रावणाआधी नारळाचे भाव १,१०० ते १,२०० रुपये शेकडा होते. सध्या हे भाव १,३०० ते १,३५० रुपये दरम्यान आहेत.

श्रावणात विविध पर्व आणि सणामुळे मागणी वाढते.

----------

पोळ्याला नारळ चढविणे आणि वाढविल्याशिवाय सण साजरा होत नाही, ही भारतातील शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. शेतात, तसेच म्हसोबा, मारुती, परिसरातील देवता, ग्रामदैवतांचे यावेळी पूजन केले जाते. त्यासाठी मान नारळाचा असतो. या वर्षी आवक चांगली असून, ग्राहकीही उत्तम आहे.

- केदार झंवर, नारळाचे हाेलसेल व्यापारी, बीड.

040921\04_2_bed_5_04092021_14.jpg~040921\04_2_bed_4_04092021_14.jpg

आंध्र प्रदेश, तामिळनाडू भागातून बीड जिल्ह्यात नारळाची मोठी आवक होत आहे. पोळ्यासाठी शेतकरी खरेदी करीत आहेत. ~आंध्र प्रदेश, तामिळनाडू भागातून बीड जिल्ह्यात नारळाची मोठी आवक होत  आहे. 

Web Title: 5 million coconuts sold in Shravan in Beed this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.