वाण धरणात ५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:34 AM2019-04-22T00:34:03+5:302019-04-22T00:35:09+5:30

परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पात सध्या ५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. शहरात पाण्याची नासाडी होऊ नये याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

5% water stock in varieties dam | वाण धरणात ५ टक्के पाणीसाठा

वाण धरणात ५ टक्के पाणीसाठा

Next
ठळक मुद्देपरळीकरांना पाच दिवसांनी मिळते पाणी : दोन महिने पुरेल एवढाच साठा; २९ कोटींची वाढीव योजना

संजय खाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पात सध्या ५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. शहरात पाण्याची नासाडी होऊ नये याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या परळी शहरात पाच दिवसाला नळ योजनेचे पाणी नागरिकांना नगरपरिषदेच्या वतीने पुरविण्यात येत आहे. अनेक प्रभागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, त्याठिकाणी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे टँकरने पाण्याची सोय करण्यात येत आहे. शहरातील कृष्णानगर, बसवेश्वर कॉलनी, आझादनगर, प्रियानगर, बँक कॉलनी या भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणचे बोअर ही आटले असल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची ही वेळ आली आहे. शहरापासून जवळ असलेल्या नागापूरच्या वाण धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणामध्ये ५ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा दोन महिने पुरेल एवढा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होऊ लागल्याने नगरपरिषद आठ दिवसाला एकदा पाणीपुरवठा करण्याच्या विचारात असल्याचे समजते. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात नगराध्यक्ष सरोजनी सोमनाथआप्पा हालगे यांनी सांगितले की, नागापूरच्या वाण धरणीची पाणी पातळी खूप कमी झाली आहे. पाणी खोल गेल्याने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे, गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी उकळून पाणी प्यावे असे आवाहनही केले आहे.
शहरात २९ कोटीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम मंद गतीने चालू आहे. योजनेचे पाणी अद्यापही अनेक प्रभागात पोहोचले नाही असा आरोप भाजपचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा यांनी केला आहे. लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित करुन सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणीही केली आहे. तुळजाईनगर व संत नरहरी मंदिर परिसरात या योजनेचे पाणी येत नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. नवीन नळ योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल व या योजनेचे पाणी नागरिकांना मिळेल तसेच अनेक प्रभागात नवीन नळ योजनेतून पाणी पुरविले जात असल्याचा दावा नगराध्यक्ष हालगे यांनी केला आहे.
जिल्हा परिषद सदस्यांचे दुर्लक्ष
४शहरालगत असलेल्या बसेश्वर कॉलनीतील पाण्याचे बोअर आटले आहेत त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागातील लोकांना पाण्यासाठी शहरात यावे लागत आहे.
४जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे व पंचायत समितीचे दुर्लक्ष झाल्याने या भागातील नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडत आहे त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे.
परळीत वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम २०११ मध्ये सुरू झालेले आहे. प्रत्यक्षात हे काम मे २०१४ मध्ये पूर्ण करायचे होते. मुदत संपून पाच वर्षे झाली तरी योजना अपूर्णच आहे. रोड फोडणे आणि पाईप टाकणे असे काम सध्या पाणीपुरवठा विभाग करीत आहे. सभापती हे घरी बसून या विभागाचा कारभार करतात. नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजपचे शहर अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केला आहे अनेक प्रभागात या योजनेचे पाणी अद्यापही आलेले नाही. विशेष म्हणजे पाणीपुरवठा विभागाच्या खात्यात शासनाने रक्कम टाकली आहे. खात्यात पैसे असूनही या योजनेचे काम नगर परिषद करत नाही याकडेही लोहिया यांनी लक्ष वेधले.

Web Title: 5% water stock in varieties dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.