श्रींना महानैवैद्याची ४८ वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:59 AM2019-07-23T00:59:58+5:302019-07-23T01:00:13+5:30
शेगाव राणा संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे बीड शहरात ४८ वर्षांपासून आगमन होत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शेगाव राणा संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे बीड शहरात ४८ वर्षांपासून आगमन होत आहे. शहरातील पेठ बीड भागातील विठ्ठल मंदिर संस्थानमुळे बीडकरांना हा भक्तियोग जुळून आलेला आहे. शेगांव येथील श्री गजानन महाराज संस्थानने देखील पत्रव्यवहारातून हे ऋणानुबंध जपले आहेत.
संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे हे ५२ वे वर्ष आहे. पंढरपूरहून पालखी सोहळा शेगावकडे जाताना बीड शहरात न येता पेंडगावमार्गे प्रस्थान होते. १९७० साली विठ्ठल मंदिर संस्थानचे वै. पांडुरंग महाराज पुजारी यांनी शेगांव संस्थानचे त्यावेळचे अध्यक्ष गोपाळराव पाटील यांना भेटून पालखी सोहळा बीड शहरातून प्रस्थान होण्यासाठी आग्रह धरला.
त्यानंतर १९७१ पासून श्रींच्या पालखी सोहळ्याचे बीड शहरात आगमन आणि दर्शनाची भाविकांना संधी उपलब्ध झाली. विठ्ठल मंदिरातच पालखीचा मुक्काम असे, नंतर जागा अपुरी पडत असल्याने काही वर्षे शुक्रवार पेठेतील बार्शीकर मिलच्या मोकळ्या जागेत पालखीचा मुक्काम होता. या जागेत निवासी बांधकाम झाल्याने शहराचे ग्रामदैवत कनकालेश्वर मंदिर परिसरात पालखीचा मुक्काम निश्चित झाला. या परिसरात पालखी दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. शिस्तबद्ध आणि सुलभ दर्शनासाठी पालखीतील वारकरी तसेच शहरातील श्री भक्त स्वयंसेवकांची भूमिका पार पाडतात. परिसराला जत्रेचे स्वरुप येते.
शेगाव संस्थानच्या श्री गजानन महाराज पालखीचे मंगळवारी (दि.२३) बीड शहरामध्ये आगमन होत आहे.,
दुपारी बारा वाजता पेठ बीड भागातील बालाजी मंदिर परिसरात व्यापारी बांधवांतर्फे पालखीचे स्वागत आणि महाआरतीचे आयोजन केले आहे.
भाविकांनी महाआरतीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
पालखी सोहळा शहरातून सुरु झाल्यापासून विठ्ठल मंदिरमार्गे नेला जातो. मंदिरात पालखी येताच पूजा, आरतीनंतर पूरणाच्या महानैवेद्याची परंपरा आजही आहे. मंदिरात होणारा हा चैतन्यदायी सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. ४८ वर्षांपासून ही परंपरा संस्थानने जपल्याचे एकनाथ महाराज पुजारी यांनी लोकमतला सांगितले.