५० कोटी लागवडीची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:26+5:302021-05-29T04:25:26+5:30
लावलेली झाडे जगली का? : यंदा फक्त १८ लाख झाडांची होणार लागवड बीड : जिल्ह्यातील ५० कोटी ...
लावलेली झाडे जगली का? : यंदा फक्त १८ लाख झाडांची होणार लागवड
बीड : जिल्ह्यातील ५० कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गंत मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली होती. दरवर्षी याअंतर्गंत ३० लाखांच्या पुढे उद्दिष्ट जिल्ह्यात येत होते. मात्र, यावर्षी फक्त १८ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरम्यान, ५० कोटी लागवड योजनेतील बीड जिल्ह्यातील राबविलेल्या दोन कोटी वृक्ष लागवडीची चौकशी लवकरच होणार आहे.
जिल्ह्यातील डोंगररांगांवर दरवर्षी वन विभाग व सामाजिक वनीकरण तसेच इतर विभागांकडून वृक्ष लागवड करण्यात येते. यासाठी ५ जून पर्यावरण दिनाचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. यासंदर्भात औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयात बैठकही झाली आहे. बीड जिल्ह्यातील डोंगररांगा, ग्रामपंचात, नगरपालिका व इतर विभागांना मिळून १८ लाख ३३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आले आहे. त्यापैकी फक्त वनविभागात ५ लाख १० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. ५ जूनपासून वृक्ष लागवडीला सुरुवात होणार असून, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, ५० कोटी वृक्ष लागवड या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक वाटा वन विभागाचा होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चदेखील करण्यात आला होता. मात्र, यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, विधानभवनातदेखील या योजनेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर या कामाच्यासंदर्भात चौकशीसाठी एक समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. या कामातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीसंदर्भात पुढील काही दिवसात चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय पातळीवरून विविध प्रकारची माहिती बीड वनविभागाकडून मागवण्यात आली आहे. वृक्ष लागवडीच्यासंदर्भात चौकशी केल्यानंतर २ कोटींपैकी किती वृक्ष जगले याची माहिती समोर येणार आहे. तर, विधिमंडळ समितीच्या अहवालानंतर या योजनेत भ्रष्टाचार? झाली किंवा नाही, हे समोर येणार आहे.
जलयुक्तप्रमाणेच ५० कोटी वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार?
जलयुक्त शिवार योजनेप्रमाणेच ५० वृक्ष लागवड योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार? झाल्याची माहिती आहे. जलयुक्त शिवार योजनेचा घोटाळा जसा बाहेर काढला तशाच पद्धतीने ५० कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात भ्रष्टाचार? झाल्याची शंका आहे. कागदोपत्री झाडं जगली असून, बीड जिल्ह्याच्या संबंधित सर्व कागदपत्रे मंत्रालयस्तरावरून मागवली आहेत. शासनाकडूनदेखील चौकशी करून अधिकाऱ्यांकडून वसुली करावी त्यांच्या सेवापुस्तिकेवर याची नोंद करावी, असे मत काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
विभागीय स्तरावरून मागवली माहिती
जिल्ह्यातील रोपवाटिका व रोपवनांची माहिती, मेअखेर जगलेल्या रोपांची माहिती, ५० कोटी वृक्ष लागडीत किती रोपांची निर्मिती केली त्यापैकी किती वापरली व किती शिल्लक राहिली, तसेच रोपवाटिकेमधून किती रोपांचे वाटप केले, विक्री किती केली व खरेदी किती करण्यात आली, यासंदर्भातदेखील माहिती मागवण्यात आली आहे. त्याचसोबत खर्च किती व कुठे झाला, याची माहिती मागवली असून, ही माहिती वन विभागाकडून अद्याप पाठवण्यात आली नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
===Photopath===
270521\052027_2_bed_13_27052021_14.jpg
===Caption===
वृक्ष लागवड