कोरोनाचा बळी ठरलेल्या दोन अंगणवाडी सेविकांना ५० लाखांचा विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:52+5:302021-05-22T04:31:52+5:30
कोरोनाच्या लढाईत अंगणवाडी सेविका या फ्रंटल वॉरिअर आहेत. गावपातळीवर गतवर्षीपासून विविध प्रकारचे सर्वेक्षण करून गावांना कोरोनामुक्त ठेवण्यात, रुग्ण शोधण्यात ...
कोरोनाच्या लढाईत अंगणवाडी सेविका या फ्रंटल वॉरिअर आहेत. गावपातळीवर गतवर्षीपासून विविध प्रकारचे सर्वेक्षण करून गावांना कोरोनामुक्त ठेवण्यात, रुग्ण शोधण्यात अंगणवाडीताईंनी मदत केली आहे. यातच अनेक अंगणवाडीताईंना कोरोनाचीही बाधा झाली. दुर्दैवाने जिल्ह्यात पाचजणींचा बळी गेला. दरम्यान, कोरोनाच्या कामादरम्यान मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाखांचा विमा दिला जातो. यासाठी पाच प्रस्ताव पाठवले गेले होते. यापैकी केज तालुक्यातील कासारी तांबवा येथील अंगणवाडी सेविका रत्नमाला बाबासाहेब हजारे व केज तालुक्यातीलच जिवाचीवाडी येथील अंगणवाडी सेविका गौळणबाई रघुनाथ तांदळे या दोन अंगणवाडी सेविकांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. शुक्रवारी याबाबतचे आदेश शासनाने काढले.
दरम्यान, रत्नमाला हजारे यांचा ११ सप्टेंबर २०२० रोजी कोरोनाने मृत्यू झाला. त्या आठ दिवस रुग्णालयात होत्या. तर, गौळणबाई तांदळे यांचा २३ सप्टेंबर २०२० रोजी मृ़त्यू झाला होता. त्या १० दिवस रुग्णालयात होत्या. त्यांना विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर मुंडे यांनी प्रयत्न केले. सीइओंच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवला व पाठपुरावा केला. यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाला. आणखी तीन अंगणवाडी सेविकांचे प्रस्तावही प्रक्रियेत असल्याचे मुंडे म्हणाले.