बीड जिल्ह्यातील नेकनूरला ५० लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:15 AM2018-07-19T01:15:07+5:302018-07-19T01:15:29+5:30
नेकनूर : बंगळुरु येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या टेम्पोची झाडाझडती घेतली असता त्यात ५० लाख रुपयांचा गुटखा आढळून आल्यानंतर पोलिसांनी टेम्पोसह गुटखा जप्त केला. नेकनूर पोलिसांनी पहाटेच्या दरम्यान चौसाळा चेकपोस्टवर ही कारवाई केली.
नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौसाळा चेकपोस्ट असून या ठिकाणी दररोज वाहनांची तपासणी केली जाते. बुधवारी पहाटेच्या दरम्यान बंगळुरूहून औरंगाबादकडे जाणाºया टेम्पो (एम.एच. ०३ सी.पी. २५६९) चालकाला थांबण्यास पोलिसांनी सांगितले. मात्र, सदरील चालकाने टेम्पो पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोत ५० लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. टेम्पोसह गुटखा पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई पो.हे.कॉ. वाघमारे, जायभाये, आगलावे, चालक बनसोडे यांनी केली. या प्रकरणी कुमार नाईक रमेश नाईक (वय ३२, रा. कर्नाटक) व शहबाज हुकुमशहा अली (वय ३५, रा. उत्तर प्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली. या घटनेची माहिती अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांना दिली. त्यानंतर अधिक चौकशी सुरू आहे.