५०० अन् २ हजारांच्या बनावट नोटा देऊन व्यापाऱ्यांनी फसवलं; शेतकऱ्यास अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 01:31 PM2023-05-02T13:31:55+5:302023-05-02T13:33:43+5:30
आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील प्रकार
- नितीन कांबळे
कडा (बीड) : डोंगरगण येथील एका शेतकर्याची पाठ बोकड विकत घेऊन बनावट नोटा देत फसवणूक करून दोघाजणांनी पाबोरा केल्याची घटना मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. शेळ्याचे व्यापारी म्हणून आले अन् बनावट नोटा देऊन गंडा घालून गेल्याचा प्रकार समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नबाजी भाऊ घोडके असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील कडा देवळाली रोडवरील डोंगरगण येथील नबाजी भाऊ घोडके हे शेळी पालन करतात. त्यांचाकडे सहा शेळ्या आहेत. मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान दोघे दुचाकीवरून घोडके यांच्या घरी आले. व्यापारी असल्याचे सांगून दोघांनी पाठ बोकड विकत घेण्यासाठी बोलणी केली. दोन्हीसाठी साडे नऊ हजार रुपयात व्यवहार झाला.
दोघांनी घोडके यांच्या पत्नी कुसुम यांच्याकडे घरात जाऊन पैसे दिले. पत्नीकडून पैसे घेताच घोडके यांना २ हजार रुपयांच्या चार, तर पाचशेच्या ३ नोटा बनावट आढळून आल्या. सर्व साडेनऊ हजारांच्या नोटा बनावट निघून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत पाठ बोकड घेऊन दुचाकीवरून दोघांनी पाबोरा केला होता. बनावट नोटा देऊन गंडा घातल्याने शेतकरी दांम्पत्यास अश्रू आवरले नाही. अंभोरा पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी केली जात आहे.