बीडमध्ये आता रस्त्यावर कचरा टाकल्यास ५०० रूपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:23 PM2018-05-16T23:23:42+5:302018-05-16T23:23:42+5:30

शहर स्वच्छतेसाठी बीड नगर पालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. रस्त्यावर कचरा टाकल्यास ५०० रूपये दंड आकारला जात आहे.

500 rupees fine if you throw garbage in the road | बीडमध्ये आता रस्त्यावर कचरा टाकल्यास ५०० रूपये दंड

बीडमध्ये आता रस्त्यावर कचरा टाकल्यास ५०० रूपये दंड

Next

शहर स्वच्छतेसाठी बीड पालिकेने उचलली कडक पाऊले
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : घर, परीसर स्वच्छ करून तिथे निघालेला कचरा उघड्यावर किंवा रस्त्यावर टाकत असाल तर थांबा.. कारण आता रस्त्यावर कचरा टाकणे महागात पडत आहे. शहर स्वच्छतेसाठी बीड नगर पालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. रस्त्यावर कचरा टाकल्यास ५०० रूपये दंड आकारला जात आहे. या कारवाईस सुरूवातही झाली आहे. यामुळे रस्त्यावर घाण करताना नागरिकांनी विचार करण्याची गरज आहे.

बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी बीड पालिका सरसावली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयांची उद्दिष्ट पूर्ण करुन पालिका आघाडीवर राहिली. त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करुन यश मिळविले. त्यामुळे बीड शहर स्वच्छ झाल्याचा दावा पालिकेने केला. असे असले तरी काही नागरिकांकडून मात्र आजही स्वच्छतेबद्दल काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये कचरा टाकणे असे प्रकार वारंवार निदर्शनास येत आहेत. त्यामुळे बीड शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी जागरुक होऊन घंटागाडी, कचराकुंडी यातच कचरा टाकावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी केले आहे.

दरम्यान, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर शासनाने कारवाई करण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले आहेत, परंतु बीड शहरात आतापर्यंत एकही कारवाई झालेली नव्हती. परंतु बुधवारी एक कारवाई करुन पालिकेने खाते उघडले. मुख्याधिकारी डॉ. जावळीकर हे बुधवारी सकाळी शहराची पाहणी करत असताना त्यांना शहरातील जवाहर कॉलनीत दोन पुरुष रस्त्यावर कचरा टाकत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ कर्मचाºयांमार्फत त्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, या कारवाईमुळे घाण करणाºयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

ओला व सुका कचरा वेगळा करा
ओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात पालिकेकडून वारंवार आवाहन केले जात आहे. परंतु याकडे काही नागरिक आजही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी वेगवेगळा कचरा करावा, असे आवाहन डॉ. जावळीकर यांनी केले आहे. दरम्यान, ओल्या कचºयापासून पालिकेकडून सेंद्रीय खत निर्मिती केली जात आहे. आतापर्यंत ८ टन खत निर्मिती झाल्याचे स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.

कचरा घंटागाडी किंवा कुंडीतच टाकावा
घरातून किंवा परिसरातून निघालेला कचरा घेण्यासाठी पालिकेची घंटागाडी गल्लोगल्ली सकाळी व संध्याकाळी येते. तसेच बाजारपेठ व इतर कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी कुंडी ठेवली जाते. नागरिकांनी यामध्येच कचरा टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करावा, असेही सांगण्यात आले.

रात्रीही घालावी लागणार गस्त
स्वच्छता विभागाचे कर्मचारी पहाटेपासूनच कामाला सुरुवात करतात. तसेच दिवसभरात पाहणी करताना नागरिक कचरा टाकत असल्याचे दिसतील, परंतु रात्रीच्या वेळी रस्त्यावर कचरा टाकणाºयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पालिकेने पथके नियुक्त करुन पोलिसांप्रमाणेच कचरा टाकणा-यांवरही वॉच ठेवण्यासाठी गस्त घालण्याची गरज आहे.

वेळोवेळी नाल्यांची सफाई करण्याची मागणी
कचºयासंदर्भात पालिकेने कडक पावले उचलली असली तरी शहरातील अनेक भागातील नाल्या वेळच्या वेळी काढल्या जात नाहीत, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो. पालिकेने नाल्यांची सफाई करावी शिवाय कचराकुंड्या भरल्यानंतर त्या वेळेत उचलाव्यात, अशी मागणीही नागरिकांतून केली जात आहे. पालिकेकडून सहकार्य मिळाल्यास नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

‘सीओं’चे आवाहन
रस्त्यावर कचरा टाकणाºयांना नियमाप्रमाणे ५०० रु. दंड आकारला जात आहे. यापूर्वी अनेकवेळा जनजागृती केलेली आहे. यापुढे जनजागृतीबरोबरच कारवाई सुरुच राहील. नागरिकांनीही घंटागाडी, कुंडीतच कचरा टाकावा. ओला व सुका कचरा वेगळा करावा, बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पालिकेला सहकार्य करण्याबरोबरच जागरुक रहावे. तक्रारी असल्यास थेट संपर्क करावा.
- डॉ. धनंजय जावळीकर, मुख्याधिकारी न.प.बीड.

Web Title: 500 rupees fine if you throw garbage in the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.