लिपिकाकडून घेतली ५ हजारांची लाच; पंचायत समितीचा विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 06:17 PM2022-06-06T18:17:21+5:302022-06-06T18:17:31+5:30
सेवा जेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या कामासाठी मागितला मोबदला
माजलगाव (बीड ) : लिपिक पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे जेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना माजलगाव पंचायत समितीचा विस्तार अधिकारी तथा प्रभारी सहायक गटविकास अधिकारी रामचंद्र होनाजी रोडेवाड यास सोमवारी पंचायत समिती आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
तालुक्यातील ग्रामपंचायत केसापुरी येथील लिपिक पदावर कार्यरत कर्मचाऱ्याचे सेव्र्त १० वर्ष पूर्ण झाले आहेत. यामुळे त्यांचे सेवा जेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद बीड यांना पाठविण्याचा मोबदला म्हणून रोडेवाड याने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने लिपिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या पंचासमक्ष १० हजार लाचेची मागणी करून तडजोडीत ५ हजार रुपये घेण्याचे रोडेवाड याने मान्य केले.
दरम्यान, आज पंचायत समिती आवारात लाचेचे ५ हजार रुपये स्वीकारताना रोडेवाड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल धस, भरत गारदे, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी यांच्या पथकाने केली.