अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी ५२ टक्के भाजला; आता मागतोय पाणी
By सोमनाथ खताळ | Published: May 24, 2023 05:52 PM2023-05-24T17:52:36+5:302023-05-24T17:53:21+5:30
खोटा गुन्हा दाखल केला म्हणत, पोलिस अधीक्षक कार्यालयात घेतले होते पेटवून
बीड : माझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत एकाने चक्क पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन पेटवून घेतले होते. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घडली होती. यामध्ये तो ५२ टक्के भाजला असून जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्षात तो सध्या पाणी पाणी करत आहे. आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संदीप पिंपळे (रा. कबाडगल्ली, बीड), असे पेटवून घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. माजलगाव येथील एका हॉटेलात मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या महिलेने संदीपसह बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही आहेर धानोरा, ता.बीड) आणि इतर चार अनोळखी लोकांनी अत्याचार केल्याची फिर्याद १६ मे रोजी बीड शहर ठाण्यात दिली होती. संदीपवर अत्याचार करून त्याचे व्हिडीओ बनवीत ब्लॅकमेल केल्याचा आरोप होता. हेच व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवत त्याने आणि त्याचे दोन सहकारी बालाजी इंगोले व गोरख इंगोले यांनी अत्याचार केला होता. त्यानंतर आपल्या चार मित्रांकडूनही त्याने अत्याचार केल्याचे फिर्यादीत होते. २०१४ ते २०२१ अशी सात वर्षे या महिलेवर अत्याचार केल्याचाही आरोप पीडितेने केला होता.
या प्रकरणात पोलिसांकडून एकही आरोपी अटक नव्हता. अशातच मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता संदीप हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आला आणि अंगावर डिझेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर जळीत कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याने पेटवून घेतल्याने दोन्ही पाय, उजवा हात आणि पाठीचा मागचा सर्व भाग जळाला आहे. जवळपास तो ५२ टक्के भाजला असून पाणी मागत आहे. सध्या तरी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्याविरोधातही आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. इतर सर्व आरोपी अद्यापही फरार असून, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यांना वेळीच अटक न केल्यास तेदेखील संदीपसारखे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही चर्चा आहे.