पावणेचार लाखांची गोव्याची विदेशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:21 AM2021-02-05T08:21:15+5:302021-02-05T08:21:15+5:30

बीड : गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असणाऱ्या विदेशी मद्याच्या ५० पेट्यांचा साठा ...

54 lakh Goan liquor seized | पावणेचार लाखांची गोव्याची विदेशी दारू जप्त

पावणेचार लाखांची गोव्याची विदेशी दारू जप्त

googlenewsNext

बीड : गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असणाऱ्या विदेशी मद्याच्या ५० पेट्यांचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड व अहमदनगर जिल्ह्याच्या संयुक्त पथकाने जप्त केला. शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे एका घरावर छापा टाकून ३० जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या दारूची महाराष्ट्र राज्यातील दराप्रमाणे एकूण किंमत ३ लाख ६४ हजार ८०० रुपये आहे.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप व पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कचे बीड येथील अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली बीड व अहमदनगर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथील रामराव कृष्णाजी जायभाये यांच्या घरावर धाड टाकली असता घरातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गोवा राज्याच्या बनावटीचा विदेशी मद्याचा साठा आढळून आला.

या धाडीत गोवा राज्यातील बनावटीच्या विविध ब्रॅन्डच्या विदेशी मद्याच्या १८० मि.लि. क्षमतेच्या २४०० सीलबंद बाटल्या, असा ३ लाख ६४ हजार ८०० रुपयांचा मद्यसाठा, तसेच एक दुचाकी व एक मोबाइल, बाटल्यांवर लावण्यासाठीचे ३ हजार बनावट लेबल, असा एकूण ४ लाख १५ हजार ८०० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क बीडचे निरीक्षक डी.एल. दिंडकर, जवान सांगुळे, वाहनचालक शेळके व अहमदनगर जिल्ह्यातील निरीक्षक बनकर, घोरतळे, दुय्यम निरीक्षक बडदे, सूर्यवंशी, धोका, ठोकळ, बारावकर व जवान ठुबे, वामने, बिटके, कांबळे, बटुळे व महिला जवान आठरे यांनी सहभाग नोंदविला.

याप्रकरणी रामराव कृष्णाजी जायभाये यास अटक करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला, तसेच गोवा राज्याची दारू छुप्या पद्धतीने महाराष्ट्रात आणून अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे तपासात निदर्शनास आल्याने आरोपीचा मुलगा बाळासाहेब याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून, धाड पडल्याची माहिती मिळताच तो पसार झाला. त्याचा शोध सुरू आहे, तसेच यामागे असलेल्या सूत्रधाराचाही शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

आवाहन

नागरिकांनी त्यांच्या परिसरात अवैध व बनावट मद्याची विक्री होत असल्यास त्याबाबतची माहिती या विभागाला द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येऊन अशा अवैध दारू विक्रेत्यांवर ठोस कारवाई केली जाईल, असे राज्य उत्पादन शुल्क, बीडचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले.

Web Title: 54 lakh Goan liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.