बीड जिल्हातून दीड वर्षात ५६ गुंड हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 06:04 PM2018-06-13T18:04:42+5:302018-06-13T18:04:42+5:30
दादागिरी करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या ५६ गुंडांना बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
बीड : दादागिरी करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या ५६ गुंडांना बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यातील काही गुंडांना लातूर, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व परभणी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दीड वर्षांत केली आहे.
दरोडा, लुटमार, चोरी, जबरी चोरी, रॉकेल माफिया, गुटखा माफिया, वाळू माफिया, हल्लेखोर असे अनेक गुन्हेगार बीडमध्ये वास्तव्यास आहेत. सर्वसामान्य नागरिकांना विविध शस्त्रांचा धाक दाखवून ते त्यांच्यात दहशत निर्माण करतात. या गुंडांच्या भीतीने त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासही कोणी पुढे येत नाही. एखादी तक्रार आल्यास पोलिसांकडून अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. त्यानंतर त्यांना जामिन मिळतो आणि पुन्हा ते गुन्हेगारी करण्यास सुरूवात करतात. वारंवार अटक करूनही सुधारणा न झाल्याने संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी या गुंडांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करतात. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पदभार स्विकारल्यापासून ५६ गुंडांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. काहींना एका वर्षासाठी तर काहींना दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी अशा कारवायांसाठी पाठपुरावा केला जातो.