११ टोळ्यांमधील ५६ गुंड हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:33 AM2019-04-09T00:33:49+5:302019-04-09T00:33:51+5:30
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ११ टोळ्यांमधील तब्बल ५६ गुन्हेगारांना बीड जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आलेले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ११ टोळ्यांमधील तब्बल ५६ गुन्हेगारांना बीड जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आलेले आहे. तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ३४ जणांविरोधात गुन्हेही दाखल झाले आहेत. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरोधात दोन ठिकाणी गुन्हे दाखल केले आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी याबाबत सोमवारी ही माहिती दिली.
लोकसभा निवडणुक निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पाडण्यासाठी बीड पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, या उद्देशाने पूर्ण नियोजन केले. हाच धागा पकडून जुगार, दारुसह इतर गुन्हे करणा-या ११ टोळ्यांची माहिती काढत त्यांच्यावर मपोका ५५ व ५६ नुसार हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३ अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई करून त्यांना स्थानबद्ध केले आणि औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात त्यांची रवानगी केली.
या मोठ्या कारवायांसह दारूबंदी व जुगार अड्ड्यांवरही धाडी टाकल्या. यामध्ये दारूबंदीच्या ५५१ केसेस करून ४६ हजार ४०९ लिटर म्हणजेच १६ लाख ५६ हजार ५७० रूपयांची दारू जप्त केली आहे. ७० जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून ११२६ आरोपी ताब्यात घेत त्यांना न्यायालसमोर हजर करण्यात आले आहे. ११२६ आरोपींना अजामीनपत्र वॉरन्टही बजावण्यात आले आहेत.
पाहिजे/फरारी असलेल्या १०४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. गेवराई व अंबाजोगाई पोलीस ठाण्यात आदर्श आचारसंहितेचा भंग करणाºयांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी दिली. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बो-हाडे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, दरोडा प्रतिबंधकचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, सर्व प्रभारी अधिकारी, कर्मचारी कारवाया करीत आहेत.
३२१७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
आचारसंहिता लागल्यापासूनच पोलसांनी गुन्हेगारीवृत्तीच्या लोकांवर विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत तब्बल ३ हजार २१७ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. याबाबरोबरच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाला सोबत घेऊन ६ ठिकाणी तर पोलिसांच्या विविध तुकड्या घेऊन ४ अशा जिल्ह्यात १० ठिकाणी पथसंचलन करण्यात आले आहे.
बीडमध्ये दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम
बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम सोमवारी दुपारी १ वाजता माळीवेस चौकात घेण्यात आली.
यावेळी उपअधीक्षक भास्कर सावंत, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड, रामराव आघाव उपस्थित होते.
२६ पोलीस कर्मचा-यांसह एक राज्य राखीव दलाच्या तुकडीने ही तालीम यशस्वी केली.