अंबाजोगाईत ग्रा.पं.च्या ५६६ उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:06 AM2017-12-13T01:06:22+5:302017-12-13T01:06:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : तालुक्यात काही महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ५६६ उमेवारांना नोटीसा देऊनही निवडणूक खर्चाचा हिशेब सादर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : तालुक्यात काही महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ५६६ उमेवारांना नोटीसा देऊनही निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नाही. या उमेदवारांविरूध्द कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पार पडल्या होत्या. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवाराने रोज व शेवटी संपूर्ण निवडणूक खर्चाच्या हिशेबाचा अहवाल सादर करणे बंधनकारक असते. तालुक्यात पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत सरपंचपदासाठी ४३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली त्यापैकी ३०० उमेदवारांनी खर्चाचा हिशेब सादर केला तर १३२ उमेदवारांनी हिशेब सादर केला नाही.
ग्रामपंचायत सदस्यासाठी २११६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते यापैकी १६८१ उमेदवारांनी हिशेब सादर केला तर ४३४ जणांनी हिशेब सादर केलाच नाही. सरपंच व सदस्य पदासाठी उभे असलेल्या ५६६ उमेदवारांनी खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याने तहसीलदार संतोष रुईकर यांनी नोटीसा देऊन त्वरीत हिशेब देण्याचे सांगितले होते. परंतु नोटीसा देऊनही हिशेब सादर केला नसल्याने या उमेदवारांविरूद्ध निवडणूक नियम भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आले आहे.
- अपात्रता किंवा निवडणुकीस बंदी
निवडून आलेल्या, बिनविरोध विजयी झालेल्या व पराभूत उमेदवारास निकालानंतर एक महिन्याच्या कालावधीत आपल्या निवडणूक खर्चाचा संपूर्ण हिशेब निवडणूक आयोगाला सादर कारणे बंधनकारक असते. नोटीसा देऊनही हिशेब सादर न करणाºया उमेदवारांवर जिल्हाधिकारी कारवाई करु शकतात. निवडूण आलेल्या उमेदवार अपात्र ठरु शकतो तर पराभूत उमेदवारास पुढील निवडणूक लढविण्यास बंदी केली जाऊ शकते.
वरिष्ठांकडे अहवाल पाठवला
नोटीस देऊनही उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला नाही. हा निवडणूक नियमाचा भंग केल्याने या उमेदवारांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
-संतोष रूईकर,
तहसीलदार, अंबाजोगाई