बीड जिल्ह्यात ५८१ बालकांचे ‘हृदय’ आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:17 AM2018-11-19T00:17:36+5:302018-11-19T00:19:32+5:30
चिमुकल्यांपासून ते वृध्दापर्यंत गंभीर आजारांनी सर्वांनाच ग्रासले आहे. जिल्ह्यात मागील सहा वर्षांमध्ये ५८१ बालकांना हृदयाचे आजार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पैकी ३०६ बालकांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयाने केलेल्या तपासणीतून ही माहिती उघड झाली आहे.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : चिमुकल्यांपासून ते वृध्दापर्यंत गंभीर आजारांनी सर्वांनाच ग्रासले आहे. जिल्ह्यात मागील सहा वर्षांमध्ये ५८१ बालकांना हृदयाचे आजार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पैकी ३०६ बालकांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयाने केलेल्या तपासणीतून ही माहिती उघड झाली आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळेस अंगणवाडी व एक वेळेस शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होते. यामध्ये ० ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावर्षीचा अंगणवाडीतील बालकांच्या तपासणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची आजही तपासणी सुरु आहे. ३२०३ पैकी १७७० शाळांमधील ४ लाख २५ हजार ७२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९४ हजार ५१५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली आहे. यात १६ हजार १६१ विद्यार्थ्यांवर शाळेमध्ये उपचार केले आहेत. तपासणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १७३२ जणांना गंभीर आजार असल्याने उपचारासाठी संबंधित रुग्णालयात पाठविले आहे. त्यात ६२ विद्यार्थ्यांना हृदयाचे आजार असल्याचे समोर आले आहे. ३७ विद्यार्थ्यांवर पुणे येथे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाल्या. उर्वरित शस्त्रक्रिया डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत. २५० पैकी २३४ जणांवर इतर गंभीर शस्त्रक्रिया झाल्या. सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत झाल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सतीश हरिदस यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविला जातो. जिल्हा समन्वयक आर. के. तांगडे हे संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतात.
२९ जणांचा शस्त्रक्रियेस नकार : कॅन्सरची एकही शस्त्रक्रिया नाही
६ वर्षांमध्ये ३०६ शस्त्रक्रिया झाल्या असला, तरीही आजही काही लोकांची शस्त्रक्रियेबाबत मानसिकता नकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. तब्बल २९ जणांनी बालकांची शस्त्रक्रिया करण्यासाठी नकार दिला आहे. ३३ शस्त्रक्रिया प्रक्रियेत आहेत. ८२ जणांकडे पाठपुरावा सुरु असून, ५० जणांच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही. इतर बालकांवर औषधोपचार केले जात आहेत. दरम्यान, नकार दिलेल्यांनी मानसिकता बदलून मुलांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला मानणे गरजेचे आहे.
मागील सहा महिन्यात ८ मुलांना कॅन्सर झाल्याचे उघड झाले आहे. मात्र, अद्याप एकाही बालकावर शस्त्रक्रिया झालेली नाही. तसेच दोन बालकांना किडनीचा आजार असून, शस्त्रक्रिया झाल्या आहेत. विविध आजारांच्या एकूण ३१०६ पैकी २५७४ शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत.
३९ पथकांमार्फत तपासणी
जिल्ह्यात अंगणवाडी व शाळांमधील बालकांची तपासणी करण्यासाठी ३९ पथके नियुक्त केलेली आहेत.
एका पथकामध्ये एक पुरुष व एक महिला वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माता, एक नर्स यांचा समावेश असतो.
बीड, परळी, आष्टी येथे प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा रिक्त आहे.