६९६ निवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांना उपदानासह वेतनवाढीचा फरक मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:28 AM2019-04-02T00:28:19+5:302019-04-02T00:28:55+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागातील एप्रिल २०१६ ते मे २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अखेर उपदान आणि वेतनवाढीतील फरकाचे ६ कोटी ६४ लाख रुपये अदा करण्यात आले आहे.
बीड : राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागातील एप्रिल २०१६ ते मे २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अखेर उपदान आणि वेतनवाढीतील फरकाचे ६ कोटी ६४ लाख रुपये अदा करण्यात आले आहे. त्यामुळे ६९६ कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे.
राज्य परिवहन महामंडळाने १ एप्रिल ते ३१ मार्च २०२० पर्यंतची वेतनवाढ जाहीर केली होती. या संदर्भात ४ सप्टेंबर २०१८ रोजी पत्राद्वारे थकीत रकमेपैकी पाच हप्ते नोव्हेंबरच्या वेतनाबरोबर देण्याचे तसेच उर्वरित थकीत रक्कम डिसेंबर २०१८ च्या वेतनापासून ४३ हप्त्यांमध्ये दरमहा वेतनाबरोबर देण्याचे आदेश काढले. १ एप्रिल २०१६ ते ३१ मे २०१८ या कालावधीत जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले, ते कराराच्या लाभासाठी पात्र असताना त्यांचा विचार झाला नव्हता. त्यामुळे या कर्मचाºयांना वेतन निश्चितीचा व पाच हप्तयांमधील उपदान, पेन्शन, शिल्लक रजा आणि वेतनवाढीचा कोणताही लाभ मिळत नव्हता. राज्यातील जवळपास १० हजार तर बीड विभागातील ५०० पेक्षा जास्त कर्मचारी या लाभापासून वंचित राहिले होते. या संदर्भात ‘लोकमतने १९ सप्टेंबर २०१८ रोजी एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाºयांना वेतनवाढ नाही, १० हजार कर्मचारी पात्र असुनही वंचित’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान या सेवानिवृत्त कर्मचाºयांचा विषय राज्य परिवहन महामंडळाकडे गेल्यानंतर लाभ देण्याबाबत निर्णय झाला, मात्र लागणाºया निधीचा प्रश्न होता.
१ एप्रिल २०१६ ते ३१ मे २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयांना अखेर फेब्रुवारी २०१९ पासून लाभ देण्याबाबत आवश्यक निधी उपलब्ध करत कार्यवाही सुरु झाली. विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय लेखाधिकारी नारायणराव मुंडे, लेखाकार प्रकाश क्षीरसागर, अमर टाकसाळ, गणेश भिल्लारे, गणेश चव्हाण, आर. एस. सय्यद, अर्जुन ठोंबरे, श्रीधर आबूज आदींनी या संदर्भात तातडीने कार्यवाही करत कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केली. ६९६ कर्मचाºयांना एकूण ६ कोटी ६४ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.
बीड विभागातील ३१२ कर्मचाºयांना २२ फेब्रुवारीदरम्यान उपदानाची रक्कम वाटप करण्यात आली. जवळपास २ कोटी ८४ लाख रुपयांचे उपदान वाटप करण्यात आले.
तसेच लागणारा निधी उपलब्ध होताच १६ ते २० मार्च दरम्यान ३८४ कर्मचाºयांना वेतनवाढीतील फरकाचे ३ कोटी ८० रुपये त्यांच्या एस. टी. को. आॅप. बॅँक आणि एसबीआयधील खात्यावर जमा करण्यात आली.