बीडमध्ये ११ विलगीकरण केंदे्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:19 PM2020-03-11T23:19:37+5:302020-03-11T23:20:13+5:30
कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवरही आता आरोग्य विभाग नजर ठेवून असणार आहे. अशा व्यक्तींसाठीच आता जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन) स्थापन करण्यात येणार आहे.
बीड : कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवरही आता आरोग्य विभाग नजर ठेवून असणार आहे. अशा व्यक्तींसाठीच आता जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन) स्थापन करण्यात येणार आहे. बीडमध्ये याची अंमलबजावणीही करण्यात आली असून या ११ केंद्रांत जवळपास ६०० लोकांची काळजी घेतली जाऊ शकते, असे सूत्रांकडून समजते. कोरोनाबाबत आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
कोरोनाचे रुग्ण राज्यातही आढळण्यास सुरूवात झाली आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तींवर आरोग्य विभागाकडून नजर ठेवून त्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत. अशातच बीडमधीलही तिघे १ मार्च रोजी दुबईहुन परतले आहेत.
आरोग्य विभागाने त्यांच्याही तपासण्या केल्या असून अद्यापही संपर्कात आहेत. हे तिघेही पुण्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या विमानात होते, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर विशेष नजर ठेवली आहे.
दरम्यान, हाच धागा पकडून अशा संपर्कात आलेल्या नागरिकांसाठी वस्तीपासून थोड्या अंतरावर स्वतंत्र केंद्र स्थापन केले आहेत. बीडमध्ये भगवान बाबा प्रतिष्ठानजवळ जागेची पाहणी केली असून आणखी दोन ठिकाणी हे केंद्र होणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात एक केंद्र निर्माण केले जाणार असून जागेची शोधाशोध केली जात आहे.
प्रत्येक केंद्रात ५० पेक्षा जास्त नागरिक राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
या सर्वांना खाणे, पिणे, झोपणे, मनोरंजनाची व्यवस्था आरोग्य विभागाकडून केली जाणार आहे. तसेच नियमित व्यायामही करून घेतला जाणार आहे. विशेष पथकाद्वारे (मैत्रीपूर्ण वातावरणात) त्यांच्यावर नजर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
घाबरू नका, संयम बाळगा
कोरोनाच्या आजाराबद्दल काही प्रमाणात खरे असले तरी त्यापेक्षा जास्त अफवाही पसरविल्या जात आहेत.
काही दिवसांपूर्वीच सिरसाळ्यात रुग्ण आढळल्याची अफवा पसरली होती. आरोग्य विभागाने सर्व खात्री करून ही अफवा असल्याचे सांगितले होते. नागरिकांनी कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये, सर्वांनी संयम बाळगावा, काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी केले आहे.