छुल्लक वादातून रागाचा पारा चढला, ६० वर्षांच्या वयोवृद्धाने पत्नीला कुऱ्हाडीने तोडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 01:38 PM2021-12-31T13:38:50+5:302021-12-31T13:43:37+5:30
Murder in Beed : हत्येनंतर पती मृतदेहाजवळ बसून होता.
गेवराई (बीड ) : तालुक्यातील गढी-माजलगावं रोडवर असलेल्या खांडवी येथे एका ६० वर्षीय वयोवृद्धाने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची माहिती असून आरोपी पती पिराजी शेजूळ यास पोलिसांनी अटक केली आहे.
संजीवनी पिराजी शेजूळ ( ५५ ) असे मृत महिलेचे नाव आहे. पिराजी शेजून हे खांडवी येथे राहतात. त्यांना विवाहित दोन मुळे आणि तीन मुली आहेत. आज पहाटे छुल्लक कारणावरून त्यांचा पत्नी संजीवनी सोबत वाद झाला. रागाच्या भरात पिराजी यांनी कुऱ्हाडीने पत्नी संजीवनीच्या डोके आणि हातावर वार केले. यात संजीवनी यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर पिराजी मृतदेहाजवळ बसून होता. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे कसलेच भाव नव्हते अशी माहिती आहे.
सकाळी शेजारी खोलीमधील मुले बाहेर आली असता त्यांना हे धक्कादायक चित्र दिसले. हत्येची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रविद्र पेरगुलवार,डि.बी पथक प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे,विठ्ठल देशमुख,गणेश नागरे,अशोक सोनवणे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती पिजारी शेजूळ यास अटक केली असून अद्याप गुन्हाच्या नोंद झाली नव्हती.