बनावट नियुक्तीपत्राद्वारे ६० तरुणांची फसवणूक;औरंगाबादच्या दाम्पत्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 01:54 PM2022-08-02T13:54:03+5:302022-08-02T13:54:40+5:30
एएमएस सर्व्हिसेस व जॉब कन्सल्टन्सी नावाची खासगी कंपनी असून, सुरक्षारक्षक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून केली फसवणूक
बीड : सुरक्षारक्षकाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल ६० सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केल्याचा प्रकार ३१ जुलै रोजी शहरात समोर आला. याबाबत औरंगाबादच्या दाम्पत्यावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
सुधीर संदीपान हजारे (४०,रा. पंचशीलनगर, बीड) यांनी याबाबत फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, अमोल साळवे व त्याची पत्नी श्रद्धा साळवे (दोघे रा. हिमायतनगर, औरंगाबाद) हे ३० जुलै २०२० रोजी बीडमधील घरी भेटले. यावेळी त्यांनी एएमएस सर्व्हिसेस व जॉब कन्सल्टन्सी नावाची खासगी कंपनी असून, सुरक्षारक्षक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १० हजार रुपये शुल्क भरावे लागेल, असे सांगितले. त्यांच्या आमिषाला बळी पडून हजारे यांनी पैसे खात्यात जमा केले. पुढे कागदपत्र पडताळणी व प्रशिक्षणासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये, असे दहा हजार रुपये उकळले. मात्र, दोन वर्षे उलटूनही नोकरी दिली नाही. हजारे यांचा तगादा वाढल्यावर बनावट नियुक्तीपत्र दिले. अधिक चौकशी केल्यावर साळवे दाम्पत्याने आपल्याप्रमाणे ५० ते ६० जणांची फसवणूक केल्याची माहिती हजारे यांना कळाली. त्यावरून शिवाजीनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास सहायक निरीक्षक मनोज लोंढे करीत आहेत.
गृहकर्जाच्या नावाखाली फसवणूक
साळवे दाम्पत्याने सुधीर हजारे यांच्या आई विमल यांना गृहकर्ज काढून देण्याच्या नावाखाली ३९ हजार रुपयांची फसवणूक केली. गृहकर्ज मंजूर करून देतो म्हणून पैसे उकळून बनावट कर्ज मंजुरीपत्र दिल्याचा उल्लेखही फिर्यादीत आहे.