बीड जिल्ह्यामध्ये ६१ हजार १५७ मतदार संशयित; डबल नावे यादीतून वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 02:18 PM2018-06-12T14:18:25+5:302018-06-12T14:18:25+5:30
जिल्ह्यात ६१ हजार १५७ मतदार संशयित असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.
बीड : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नवीन मतदार वाढवणे तसेच बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबली जात असून जिल्ह्यात ६१ हजार १५७ मतदार संशयित असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.
येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने २१६५ मतदान केंद्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नोंदणी करणे. मयत, दोन किंवा अनेक ठिकाणी मतदान यादीत असलेल्यांची नावे वगळणे, मतदान यादीतील नावे दुरूस्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. आगामी निवडणूकीत मतदार म्हणून आपल्या अधिकाराबाबत मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तसेच नवमतदार नोंदणीवर भर देण्यात येणार आहे. आगामी निवडणूका पारदर्शकपणे, शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी प्रवीण धरमकर, उप जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे हे उपस्थित होते.
सोयीनुसार दोन मतदार संघात नावे
संपूर्ण जिल्ह्यात तब्बल ६१ हजार १५७ मतदार संशयास्पद आहेत. यातील काही मतदार शहरी व ग्रामीण भागातील यादीत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या निदर्शनास आली आहे. एकाच व्यक्तीचे अनेक मतदार यादीतील नाव देखील या कार्यक्रमाद्वारे वगळण्यात येणार आहेत.
मतदान केंद्रे वाढवणार
जिल्ह्यात २१ हजार १६५ मतदान केंदे्र आहेत. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवली जाणार आहे. कोणत्या कक्षात, प्रभागात आपले मतदान आहे, हे पाहणे नागरिकांना जिकिरीचे असते. एकाच कुटुंबाचे मतदान वेगवेगळ््या प्रभात किंवा कक्षात आल्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती देखील निर्माण होते. याला आळा घालण्यासाठी एखादे कुंटुंब, वस्ती, शहरातील अपार्टमेंट, यांच्यासाठी एकच मतदार केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. जेणेकरून नागरिकांना मतदानाचा हक्क बजावताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
मतदारांची संख्या वाढणार
जिल्ह्यात १० लाख ५० हजार २८६ पुरूष मतदार तर ९ लाख २३ हजार ९६२ स्त्री तसेच व १० तृतीयपंथी असे एकूण १९ लाख ७४ हजार २५८ मतदार आहेत. यामध्ये ४० ते ६० हजार मतदारांची वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.
कृष्णधवल फोटो बदलणार
४१ हजार ३३३ मतदारांचे कार्डवरील कृष्णधवल फोटो तसेच जुने लहानपणीचे फोटोदेखील बदलले जाणार आहेत.पूर्वीच्या मतदार कार्डवर १६ अंकी क्रमांक होते त्यात देखील बदल होणार आहेत.
मतदार जनजागृती...
मतदानाच्या दृष्टीने जनजागृती व्हावी यासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांचे शिक्षक यांच्यामार्फत ६०० ठिकाणी मतदार साक्षरता क्लब राबवले आहेत.
संशयास्पद मतदार
गेवराई ११६६१
बीड १०५८२
आष्टी १०८३९
केज १०५३७
परळी ८४५७
माजलगाव ९०८१
एकूण ६११५७