बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ६२ लाखांचा तूर, उडीद घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 01:16 PM2019-05-18T13:16:25+5:302019-05-18T13:23:27+5:30
सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल
बीड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने २०१६-१७ च्या हंगामात खरेदी केलेल्या तुरीची परस्पर विक्री करून ६ लाख २३ हजारांचा आणि उडीद खरेदीच्या बदल्यात शेतकऱ्यांना देण्यासाठी आलेल्या ५६ लाख २७ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळावर शुक्रवारी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले.
२०१७ साली ३१ मेपर्यंत नाफेडच्या वतीने राज्यामध्ये पणन महासंघामार्फत तूर व उडीत खरेदी करावयाची होती. त्यासाठी बीड कृषी उत्पन्न बाजार समितीने सब एजंट म्हणून बीड जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची नेमणूक केली होती. या संस्थेच्या गेवराई केंद्रावर ९८ हजार ७३९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. परंतु त्यापैकी १२१.५१ क्विंटल तुरीची खरेदी करून केंद्र शासन किंमत समर्थन योजनेच्या अभिलेखात नोंद न करता तसेच फेडरेशनला न कळविता परस्पर विक्री केली व ६ लाख १३ हजार ६२५ रुपयांचा अपहार केला. तुरीचे पैसे मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ३ मे रोजी बीडच्या जिल्हा पणन अधिकाऱ्यांना सदर संस्थेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पणन महासंघाचे विभागीय अधिकारी रमेश नारायण ठोकरे यांच्या फिर्यादीवरून बीड जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळावर पेठ बीड ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली करीत आहेत.
संचालक मंडळात कोण?
तूर आणि उडीद खरेदीतील गैरव्यवहार प्रकरणी बीड जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेचे संचालक दत्तात्रय जयवंतराव धट, अशोक सोपानराव जाधव, बाबासाहेब रामचंद्र घोडके, अशोक वैजनाथ वाव्हळ, शेख रशीद शेख गफूर, राजेंद्र मच्छिंद्र मोरे, व्यंकटराव सीताराम जोगदंड, भीमराव लक्ष्मण रोडे, तात्याबा नानासाहेब देवकते, विश्वास तात्यासाहेब आखाडे, सखाराम आबाराव मस्के, सुनंदाबाई श्रीराम घोडके, गंगूबाई नारायण मुळे, व्यवस्थापक सी.एच. बागवान, खरेदी केंद्र प्रमुख आणि कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. मागील वर्षीच्या खरेदीतही दीड कोटीचा अपहार : याच संस्थेने मागील वर्षी खरेदी केलेला १ कोटी ४ लाख १६ हजार ६९२ रुपये किंमतीचा २,३६७ क्विंटल हरभरा आणि ३९ लाख ४४ हजार ७१० रुपयांची ७२४ क्विंटल तूर वखार महामंडळाच्या गोदामात जमा न करता जवळपास दीड कोटींचा अपहार केल्याचा गुन्हा मागील महिन्यात नोंदविण्यात आला आहे.
उडीद खरेदीतही अपहार
आॅक्टोबर ते १३ डिसेंबर २०१७ या काळात बीड, कडा, परळी व वडवणी येथील केंद्रावर एकूण २५ हजार ५१३ क्विंटल उडदाची खरेदी केली. बदल्यात शासकीय हमीभावाप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यासाठी १३ कोटी ७७ लाख ७१ हजार २८० रुपये रकमेचे निरनिराळे धनादेश शासनाकडून या संस्थेला देण्यात आले; परंतु शासनाकडून रक्कम येऊनही या संस्थेने ११५ शेतकऱ्यांना त्यांच्या उडीदाची ५६ लाख २७ हजार १०४ रुपयांची रक्कम अदा केलीच नाही. याबाबत अशोक येडे यांनी फेब्रुवारीत आंदोलन केले होते. पणन महासंघाचे विभागीय अधिकारी रमेश नारायण ठोकरे यांनी पेठ बीड पोलीस ठाण्यात अपहाराची तक्रार दिल्यानंतर या संस्थेच्या संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.