ऐन पावसाळ््यात सुरु होणार ६५० टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:40 AM2019-07-14T00:40:18+5:302019-07-14T00:40:42+5:30
जुलै महिन्याचे १२ दिवस उलटून देखील मोठा पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. जिल्हा प्रशासनाने पुन्हा टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत.
बीड : जुलै महिन्याचे १२ दिवस उलटून देखील मोठा पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. जिल्हा प्रशासनाने पुन्हा टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ऐन पावसाळ््यात पाणीपुरवठा करण्यासाठी ६५० टँकर सुरु होणार आहेत.
एप्रिल ते जून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पिण्याचा प्रश्न गंभीर होता. त्यांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी ९०० पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. दरम्यान दुष्काळी कालावधी संपल्यामुळे व जून महिन्याच्या शेवटी तरी मोठा पाऊस पडेल ही अपेक्षा असल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद केला होता. मात्र, जुलै महिन्याची १३ तारीख आली तरी देखील मोठा पाऊस न झाल्यामुळे, पुन्हा ग्रामीण भागातून टँकरची मागणी होऊ लागली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्यांमधून टँकरची आवश्यकतेनुसार मागणीचे प्रस्तवा मागवले होते. त्यानूसार सर्व तालुक्यांनी पुन्हा एकदा जवळपास ६५० टँकरची मागणी केली आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे भर पावसाळ््यात ६५० टँकर सुरु होणार आहेत. तसेच जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे सर्व छोटी- मोठी धरणे देखील कोरडी पडली आहेत. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना कायम आहे.
भविष्यकाळाची घोर चिंता
जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे छोटे-मोठे १४४ प्रकल्प कोरडेठाक आहेत. माजलगाव धरणात गोदापात्रातून पाणी येण्याची शक्यता आहे. मात्र, इतर ठिकाणी नद्या कोरड्या असल्यामुळे मोठा पाऊस पडेपर्यंत प्रकल्प कोरडेठाक राहणार आहेत. मोठा पाऊस पडला नाही तर पुढील काळात पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.