६५६ गावात स्मशानभूमीच नाही; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:चेच रचले सरण
By शिरीष शिंदे | Published: June 12, 2023 07:37 PM2023-06-12T19:37:52+5:302023-06-12T19:38:25+5:30
सामाजिक कार्यकर्ते एकवटले; पावसाळ्यातील अंत्यसंस्काराच्यावेळी होणारी हेळसांड थांबविण्याची मागणी
बीड: जिल्ह्यातील १३९४ पैकी ६५६ लहान मोठ्या गावात स्मशानभूमीची सोय नसल्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार दरम्यान मृतदेहाची हेळसांड होते. जिल्हा प्रशासनासाने स्मशानभुमीचा प्रश्न निकाली काढवा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वत:चे सरण रचून सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनात इतर सामाजिक कार्यकर्तेही सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली.
जिल्ह्यातील ६५६ गावामध्ये स्मशानभुमी नाही. अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीची सुद्धा दुरावस्था झाली असून अंत्यसंस्कार दरम्यान काही गावांमध्ये ग्रामस्थांमध्ये वादविवाद होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. काही गावात स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची जागा नसते, त्यामुळे उघड्यावर अंत्यसंस्काराची वेळ येते. अशा ठिकाणी शासनाने गायरान जमिनीतुन जागा उपलब्ध करून द्यावी. काही गावात स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अडवला गेला आहे. त्यामुळे वादविवाद निर्माण होतात. असे वादविवाद टाळण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. तसेच काही गावांमध्ये विशिष्ट समाजासाठी स्मशानभूमी असते. त्याशिवाय काही गावात शेतालगत अंत्यसंस्कार केले जातात. परंतु तेथील शेतकऱ्यांचा विरोध असतो. केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी) या ठिकाणी ३ महिन्यात ३ मागासवर्गीय समाजाचे अंत्यविधी रोखण्याचा प्रकार घडला होता तर परळी तालुक्यातील वडखेल या गावात स्मशानभूमीवर अतिक्रमण असल्याने प्रेत शेतात जाळण्याची वेळ आली होती. जिल्हा प्रशासनाला गांभीर्य नाही.
यांनी केले आंदोलन
स्मशानभुमीचा प्रश्न निकाली काढावा या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने दिली मात्र कोणतीच कारवाई न केल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरण रचुन ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात रामनाथ खोड, शेख युनुस, बलभीम उबाळे, मुबीन शेख, मुस्ताक शेख, अशोक येडे, बाळासाहेब मुळे आदी सहभागी होते. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना दिले.