३७ डिग्रीतही झाले ६६ टक्के मतदान; बीडच्या मतदारांनी दाखवला उत्साह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:39 AM2019-04-19T00:39:57+5:302019-04-19T00:40:41+5:30

बीड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पाडले. पारा ३७ अंश सेल्सिअस राहिल्याने वातावरण संतुलित होते. त्यामुळे मतदानासाठी मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. सकाळच्या टप्प्यात संथ, नंतर गतीने मतदान झाले.

66 percent voting in 37 degrees; Beed voters show enthusiasm! | ३७ डिग्रीतही झाले ६६ टक्के मतदान; बीडच्या मतदारांनी दाखवला उत्साह!

३७ डिग्रीतही झाले ६६ टक्के मतदान; बीडच्या मतदारांनी दाखवला उत्साह!

Next
ठळक मुद्देपारा चढला अन् मतदानाचा टक्काही सकाळ-सायंकाळी मतदारांचा उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क ।

बीड : बीड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पाडले. पारा ३७ अंश सेल्सिअस राहिल्याने वातावरण संतुलित होते. त्यामुळे मतदानासाठी मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. सकाळच्या टप्प्यात संथ, नंतर गतीने मतदान झाले. १ ते ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया संथ गतीने पार पडली. त्यानंतर मात्र गर्दी वाढली होती. बीड मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानाची अंतिम अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केल्यावर यात काही अंशी बदल होण्याची शक्यता आहे.
बीड : देशात दुसऱ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत बीड लोकसभा मतदार संघात सरासरी ६५.९४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यातील २३२५ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. या मतदारसंघात भाजपाच्या डॉ.प्रीतम मुंडे, राष्टÑवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे, वंचित आघाडीचे विष्णू जाधव यांच्यासह ३६ उमेदवार रिंगणात होते.
सकाळी सात वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ७ टक्के मतदान झाले होते. तापमानाची तीव्रता कमीच होती. १० वाजेनंतर केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसत होती.
दुपारी १ वाजेपर्यंत ३४.६५ टक्के मतदान झाले होते. दुपारी मतदानाचे प्रमाण संथ होत गेले. ३ वाजेपर्यंत ४६.४७ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.३९ टक्के मतदान झाले होते. मतदान केंद्रांवर गर्दी झाल्याने ६ वाजेपर्यंत केंद्रात आलेल्या मतदारांना मतदान करता आले. जिल्ह्यातील ७१ केंद्रांपुढे रांगा होत्या.
मतदान प्रक्रियेच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुम निर्माण केली होती. २३३ मतदान केंद्रातील प्रक्रियेचे वेब कास्टिंगद्वारे नियंत्रण केले जात होते. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, निवडणूक निरीक्षक अशोक शर्मा, आचारसंहिता कक्ष प्रमुख सीईओ अमोल येडगे, उप जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात चोख पोलीस बंदोबस्त होता. दिवसभर कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
मतदान यंत्र बदलावे लागले
काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे एकूण १३ कंट्रोल युनिट, ३९ बॅलेट युनिट, २४ व्हीव्हीपॅट बदलावे लागले.
नातवांचे कर्तव्य, आजीने बजावला हक्क
धारुर तालुक्यातील सोनीमोहा येथील १०३ वर्षांच्या अप्रुगाबाई नारायण तोंडे यांना त्यांच्या नातवांनी दुचाकीवर मतदान केंद्रापर्यंत आणले. मतदानाचा हक्क बजावताना अप्रुगाबाईच्या चेहºयावर हास्य होते. ज्येष्ठ महिला मतदान केंद्रात येत असल्याचे दिसताच मतदान केंद्राचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदरपूर्वक बाहेर जाऊन ज्येष्ठ महिलेचे स्वागत केले. त्यानंतर अप्रुगाबाई यांनी आपल्या नातवांच्या सहाय्याने मतदानाचा हक्क बजावला. वय किती असले तरी आपल्या लोकशाहीसाठी मतदान केलेच पाहिजे असा संदेश या वृध्देने दिला. त्याचबरोबर नातवांनीही आपले कर्तव्य बजावले.
किसीने डराया, धमकाया ?
किसीने डराया, धमकाया? मर्जीसे वोट कर रहे हो ना ? असे विचारत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील धांडे गल्ली, मोमीनपुरा व अन्य मतदान केंद्रांना भेटी देत त्यांनी मतदारांशी संवाद केला. ‘काही जोर जबरदस्ती आहे का? कोणी धमकावलं काय? काही समस्या आहे का? फ्री और फेअर इलेक्शन हो रहा है? असे प्रश्न विचारताच मतदारांनी नाही असे उत्तर दिले. मै खुद चेक करने आया हूं, अपनी मर्जी से वोट कर रहे है ना? कोई डरा- धमका रहा तो मुझे बताओ, असे सांगून जिल्हाधिकारी दुसºया केंद्रावर भेट देण्यासाठी जातात. बीडकरांना हा असा पहिलाच अनुभव होता.

Web Title: 66 percent voting in 37 degrees; Beed voters show enthusiasm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.