६८ हजार लाभार्थी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:25 AM2019-01-07T00:25:07+5:302019-01-07T00:25:50+5:30
पायाभूत सर्वेक्षणात असलेल्या परंतु शौचालय बांधकामे पूर्ण केलेले जिल्ह्यातील ६८ हजार लाभार्थी प्रोत्साहनपर बक्षीस अनुदानाच्या रकमेपासून वंचित राहिले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पायाभूत सर्वेक्षणात असलेल्या परंतु शौचालय बांधकामे पूर्ण केलेले जिल्ह्यातील ६८ हजार लाभार्थी प्रोत्साहनपर बक्षीस अनुदानाच्या रकमेपासून वंचित राहिले आहेत. दरम्यान निधी वितरित न झालेल्या या लाभार्थ्यांच्या प्रोत्साहनपर बक्षिसाची रक्कम त्यांच्या खात्यावर ३१ जानेवारीपर्यंत तात्काळ वितरित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पायाभूत सर्वेक्षणाप्रमाणे १२ जानेवारी २०१८ रोजी बीड जिल्हा हागणदारी मुक्त घोषित करण्यात आला. परंतु शासनाच्या संकेतस्थळावर ६८ हजार कुटुंबांना लाभ दिल्याची नोंद दिसून येत नाही. संकेतस्थळावर नोंद न झाल्यामुळे या सर्व लाभार्थ्यांना लाभ दिला नाही अशा प्रकारचा संदेश जात आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पायाभूत सर्वेक्षणाप्रमाणे आर्थिक नोंदी करावयाच्या यादीचे वाचन करावे तसेच या यादीनुसार काही तांत्रिक कारणामुळे निधी वितरित करणे शक्य झाले नसल्यास संबंधिताचे प्रस्ताव तात्काळ जमा करून निकाली काढावेत असेही आदेश दिले आहेत.
आर्थिक नोंदी करताना आणि निधी वितरण करताना शासकीय नोकरदार, बहुधारक तसेच ग्रामपंचायत सदस्य अथवा प्रत्यक्षात एकत्र राहत असलेल्या कुटुंबातील परंतु विभक्त म्हणून नोंद केलेल्या कुटुंबांना लाभ दिला जाणार नाही याबाबत संपूर्ण खातरजमा करून पात्र लाभार्थ्यांना तत्काळ लाभ वितरित करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिका-यांनी आदेश दिले आहेत. या कामासाठी ‘३१ जानेवारी’ ही डेडलाईन दिली असून, यंत्रणा त्यादृष्टीने कामाला लागली आहे.