७ लाख नागरिकांचा पाणीप्रश्न ऐरणीवर; मांजरा धरणात केवळ ५ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 07:29 PM2018-07-27T19:29:12+5:302018-07-27T19:30:32+5:30
अंबाजोगाई, लातूर, केज, धारूर, कळंबसह आसपासच्या खेड्यापाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी पुरेसा साठा झालेला नाही.
अंबाजोगाई (बीड) : अंबाजोगाई, लातूर, केज, धारूर, कळंबसह आसपासच्या खेड्यापाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी पुरेसा साठा झालेला नाही. परिणामी आगामी काळात सात लाख नागरिकांची तहान भागवायची कशी? हा मोठा प्रश्न प्रशासनाला भेडसावत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पर्यायी योजनांही कमकुवत ठरू लागल्याने आगामी काळात पाऊस न पडल्यास पाणीप्रश्न तीव्रतेने भेडसावणार आहे.
अंबाजोगाई व परिसरात जूनच्या प्रारंभीपासूनच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे पेरण्या झाल्या मात्र, पाणीसाठा वाढला जाईल, असा एकही पाऊस जून व जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत झालेला नाही. आष्टी, पाटोदा, मांजरसुंबा या परिसरात मुसळधार पाऊस झाला तरच मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात मुबलक प्रमाणात वाढ होते. मात्र, गत वर्षी मोठा पाऊस झाल्याने धरण भरले होते. शेतकऱ्यांना देण्यात आलेले पाणी व धरणावर अवलंबून असेल्या पाणीपुरवठा योजना यामुळे पाणीसाठा १०० वरुन ५ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. ९५ टक्के पाण्याचा वापर वर्षभरात झाला. आतापर्यंत झालेल्या पावसाळ्यात एकही मोठा पाऊस न झाल्याने जमिनीवरुन पाणी अद्यापतरी वाहिले नाही. परिणामी मांजरा धरणातील पाणीसाठा अद्यापही वाढलेला नाही.
अंबाजोगाई शहराच्या पाणीपुरवठ्याची मोठी भिस्त मांजरा धरणावरच आहे. साठा संपत आल्याने धरणातून पाणीपुरवठा कधी ठप्प होईल याची अंबाजोगाईकरांना धास्ती आहे. शहरासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून काळवटी साठवण तलावाचा आधार आहे. मात्र, अत्यल्प पावसामुळे या धरणात केवळ ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध असलेले पाणी कसेबसे तीन ते चार महिने शहरवासियांना देता येईल. दरम्यान, दोन महिन्यांचा पावसाळा लोटला तरी एकदाही मोठा पाऊस न झाल्याने परिसरातील सर्वच जलस्त्रोत निकामी झाले आहेत. ग्रामीण भागातही परिस्थिती पावसाअभावी दयनीय बनल्याचे दिसून येत आहे. आता उरलेल्या नक्षत्रांत किंवा परतीचा मोठा पाऊस न झाल्यास अंबाजोगाईकरांना पाणीप्रश्न तीव्रतेने भेडसावणार आहे.
धरणात केवळ ५.६७ द.ल.घ.मी. पाणीसाठा
मांजरा धरणात सध्या ५.६७ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध असून, पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवला आहे.धरणात पाणीसाठा अत्यल्प राहिल्याने शेती अथवा इतर बाबींना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे, अशी माहिती मांजरा धरणाचे उपअभियंता महेंद्र जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली.
मांजराच्या भोवतालचे प्रकल्पही कोरडेठाक
मांजरा धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी डोकेवाडा, अप्परमांजरा, वाघेबाभूळगाव, महासांगवी हे प्रकल्प भरणे गरजेचे असते. हे प्रकल्प तुडुंब भरल्यानंतरच पाण्याचा प्रवाह मांजरा धरणात येतो.अद्यापपर्यंत अत्यल्प झालेल्या पावसामुळे हे प्रकल्पच भरले नाहीत. परिणामी धरणाकडे येणारा पाण्याचा प्रवाह अद्यापतरी सुरू झाला नाही. हे प्रकल्प भरल्यानंतर धरणातील पाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.