आरोपींच्या संपर्कात आलेल्या ७ पोलिसांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 08:20 PM2020-08-22T20:20:07+5:302020-08-22T20:26:22+5:30
गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेने गेवराईत चार वाळूचे टिप्पर ताब्यात घेतले होते.
बीड : स्थानिक गुन्हे शाखेने उमापुर फाट्यावर गेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार हायवावर कारवाई करत आरोपींना अटक केली होती. यातील दोन आरोपींना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या सहवासातील सात पोलीस कर्मचाऱ्यांनाही आता कोरोना संसर्ग झाला आहे. गुरुवारी रात्री त्यांचा अहवाल आल्याने चकलांबा पोलीस ठाण्यात खळबळ उडाली.
गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेने गेवराईत चार वाळूचे टिप्पर ताब्यात घेतले होते. ते कारवाईसाठी चकलांबा पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना एका टिप्पर चालकाने गाडी आडवी लावून टिप्परमध्ये बसलेल्या पोलिसांना दमदाटी करत वाळूसह टिप्पर पळवून नेले होते. यानंतर चकलांबा पोलिसांनी एक पथक या वाळू माफियांच्या शोधात पाठविले. त्यानंतर १२ आॅगस्ट रोजी वळी येथून चार आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर १७ आॅगस्ट रोजी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात २ आरोपी पॉझिटिव्ह आल्याने आरोपीच्या शोधात गेलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या एका पोउपनिसह कर्मचाऱ्याची १९ आॅगस्ट रोजी कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.