बीड जिल्ह्यात १८ वर्षांत ७ तर दोन वर्षांत ९ टोळ्यांवर ‘मोका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:37 PM2018-10-11T23:37:50+5:302018-10-11T23:38:30+5:30
मागील १८ वर्षांमध्ये ७ टोळ्यांवर ‘मोका’ची (महाराष्ट्र गुन्हेगारी संघटीत नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आलेली आहे. तर केवळ दोन वर्षांत तब्बल ९ टोळ्यावर मोकाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच २१ अट्टल गुन्हेगारांची ‘एमपीडीए’अंतर्गत औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवाणगी केली आहे. या कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील १८ वर्षांमध्ये ७ टोळ्यांवर ‘मोका’ची (महाराष्ट्र गुन्हेगारी संघटीत नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आलेली आहे. तर केवळ दोन वर्षांत तब्बल ९ टोळ्यावर मोकाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच २१ अट्टल गुन्हेगारांची ‘एमपीडीए’अंतर्गत औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवाणगी केली आहे. या कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासह त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी बीडपोलिसांनी कडक पाऊले उचलली आहेत. १९९९ पासून मोका कायदा अंमलात आला. संघटीत होऊन गुन्हे करणाऱ्यांना व्यसन घालून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. मागील १८ वर्षांत बीडमधील ७ टोळ्यांवर मोकाची कारवाई करण्यात आलेली आहे. पैकी एक प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. तर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पदभार स्विकारल्यापासून म्हणजेच जानेवारी २०१७ पासून आजपर्यंत ९ टोळ्यांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली. यामध्ये आठवले गँग, कोल्हापूरची आर्या गँग, पवार आणि भोसले गँग, अंबाजोगाई उपविभागातील विलास बडे गँगचा समावेश आहे. दोन वर्षांत कारवाया केलेल्या या सर्व गँगचे रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. त्यांनी अनेकांचा जीव घेण्याबरोबरच दहशत माजविली होती. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर काही प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसला आहे. आणखी काही टोळ्या अधीक्षक जी.श्रीधर यांच्या निशाण्यावर आहेत. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि घनश्याम पाळवदे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कुख्यात गुन्हेगारांवर नजर असते. मोका व एमपीडीए संदर्भात पोह अभिमन्यू औताडे तर हद्दपारीसंदर्भात पोह मोहन क्षीरसागर हे आढावा घेतात.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका
सण, उत्सव, कार्यक्रम आदींना डोळयासमोर ठेवून शहर व तालुक्यात दहशत माजविणाºया गुन्हेगारांची माहिती मागवून त्यांच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जाते.
आदेश प्राप्त होताच त्यांची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली जाते. दोन वर्षात २१ जणांना जेलची हवा खावी लागली आहे. आणखी तीन प्रकरणे प्रलंबित असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
१३२ गुंड जिल्ह्यातून हद्दपार
मटका, जुगार, दरोडेखोर, चोरांसारख्या विविध गुन्ह्यांत असलेल्या १३२ गुंडांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. कलम ५५ नुसार ३१, ५६ नुसार ७३ तर ५७ नुसार २८ कारवाया करण्यात आलेल्या आहेत.
.....
कुख्यात गुन्हेगारांची माहिती मागवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच गुन्हेगारी संपविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यापुढेही मोका, एमपीडीए, तडीपारच्या कारवाया सुरूच राहतील. तसेच प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे आदेशही
दिलेले आहेत.
- जी.श्रीधर,
पोलीस अधीक्षक, बीड