बीडमध्ये ७० शाळांमध्ये ‘सॅनिटरी’चे यंत्र बसविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:06 AM2018-04-04T00:06:35+5:302018-04-04T00:06:35+5:30
अस्मिता योजनेंतर्गत जिल्ह्यातील जि.प.शाळांमधील किशोरवयीन मुलींना सवलतीमध्ये सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर वापरानंतर नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्ह्यातील ७० माध्यमिक शाळांमध्ये इलेक्ट्रीक इंसीनिरेटर बसविले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अस्मिता योजनेंतर्गत जिल्ह्यातील जि.प.शाळांमधील किशोरवयीन मुलींना सवलतीमध्ये सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर वापरानंतर नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्ह्यातील ७० माध्यमिक शाळांमध्ये इलेक्ट्रीक इंसीनिरेटर बसविले जाणार आहेत.
ग्रामीण भागातील जि. प. शाळांतील किशोरवयीन मुलींना सवलतीच्या दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध केले जात आहेत. बीड जिल्ह्यात ५ हजार मुलींच्या नोंदणीचा अंदाज आहे. सॅनिटरी नॅपकीन उपलब्धतेबरोबरच आरोग्य व स्वच्छतेच्या अनुषंगाने वापरानंतर नॅपकीनच्या विल्हेवाटीसाठी इलेक्ट्रीक इंसीनिरेटर जिल्ह्यातील ७० माध्यमिक शाळांच्या प्रसाधनगृहात बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सॅनिटरी नॅपकीनच्या वापरानंतर ते इकडे- तिकडे फेकण्यात येते. त्यामुळे संसर्ग तसेच आजारांचा धोका नाकारता येत नाही. वैज्ञानिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने वापरानंतर नॅपकीनची विल्हेवाट महत्वाची असते. त्यामुळे शाळांमधून इंसीनिरेटर मशीन बसविण्यात येत आहेत.
१० लाख रुपयांची तरतूद
वापरानंतर सॅनिटरी नॅपकीनची इलेक्ट्रीक इंसीनिरेटरच्या माध्यमातून विल्हेवाट लावता येईल. इंसीनिरेटरसाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी ते महत्वाचे ठरेल.
- अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड.
अंगणवाडींना प्रोत्साहन
जिल्ह्यातील ज्या अंगणवाडी सुधारणा, सुविधा व डिजिटलसाठी दहा हजार रुपयांचा लोकसहभाग संकलित करतील त्या अंगणवाडींना शैक्षणिक साधन, खेळणी, चार्टसाठी एक हजार रुपये जि. प. च्या वतीने देण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.