७०९ फुकट्या प्रवाशांना एक लाखाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:56 PM2019-07-04T23:56:38+5:302019-07-04T23:56:59+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये विना तिकीट प्रवास करणे प्रवाशांना चांगलेच अंगलट येत आहे.
बीड : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये विना तिकीट प्रवास करणे प्रवाशांना चांगलेच अंगलट येत आहे. मागील दोन वर्षात ७०९ फुकटे प्रवासी तपासणीतून उघड झाले आहेत. त्यांच्याकडून १ लाख ७ हजार ८६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे फुकट्या प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीला निर्बंध घालण्यासह महामंडळाच्या बसेसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी विशेष पथके नियूक्त केलेले आहेत. या पथकांनी ठिकठिकाणी बसेसची तपासणी केली. यामध्ये त्यांना २०१७-१८ मध्ये ३२५ प्रवासी आढळले. त्यांच्याकडून ६३ हजार ३३८ रुपयांचा दंड वसूल केला तर २०१८-१९ मध्ये ३८४ प्रवाशांकडून ४३ हजार ७४८ रुपयांचा दंड वसूल केला. हा दंड तिकीटाच्या दुप्पट आकारला जात असल्याचे विभागीय वाहतूक अधीक्षक हर्षद बनसोडे म्हणाले.
वाहकांवरही कारवाईची टांगती तलवार
ज्या बसमध्ये विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी आढळले, त्यांचा अहवाल तयार करून विभागीय नियंत्रकांकडे पाठविला जातो. त्यानंतर याची चौकशी करून संबंधित वाहकांवर कारवाई केली जाते. प्रवाशांबरोबर वाहकांवरही या प्रकरणात कारवाईची टांगती तलवार असते. दोन वर्षात किती कारवाया झाल्या, हे मात्र समजू शकले नाही.