दोन लाख लोकांसाठी ७१ पोलीस अधिकारी, कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:41 AM2021-09-10T04:41:04+5:302021-09-10T04:41:04+5:30
सखाराम शिंदे गेवराई : ७७ गावे, २६ तांडे अशा दोन लाख लोकसंख्येच्या परिसरावर नियंत्रण ठेवताना गेवराई ठाण्यातील पोलीस ...
सखाराम शिंदे
गेवराई : ७७ गावे, २६ तांडे अशा दोन लाख लोकसंख्येच्या परिसरावर नियंत्रण ठेवताना गेवराई ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कसरत होत आहे. केवळ ६६ अंमलदार व ५ अधिकारी अशा ७१ जणांवर ठाण्याचा कारभार चालत असून त्यात बंदोबस्तासाठी असणारे वाहनही बिघडलेले असते.
येथील पोलीस ठाण्यासाठीचे वाहन खराब झाल्याने दोन महिन्यांपासून दुरुस्तीला आहे. त्यामुळे येथील पोलीस ठाण्यात जुनी जिप्सी देण्यात आली असून ती केव्हा बंद पडेल याचा नेम नाही. अशा एका वाहनाआधारे एवढ्या मोठ्या ठाण्याचा कारभार चालवायचा कसा असा प्रश्न आहे. बंदोबस्त असो वा तपास अधिकारी व कर्मचाऱ्यांना सध्या स्वत:च्या किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. एका जुन्या जिप्सी गाडीवर दोन लाख लोकांचे संरक्षण करायचे, कसे असा प्रश्न खुद्द पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडला आहे. सध्या पूरपरिस्थिती व गुन्ह्याचे प्रमाण पाहता वाहनांची गरज आहे. तसेच सात बिटसाठी सात दुचाकी आहेत. त्यावरही पावसापाण्यात कसे फिरणार? असा प्रश्न आहे. विविध ठिकाणी बंदोबस्त तसेच पेट्रोलिंग, गुन्ह्याचा तपास, आरोपी अटक करणे तसेच शासकीय कार्यक्रम अशा विविध ठिकाणी वाहन लागते. मात्र येथील ठाण्याला सध्या चांगले वाहन नसल्याने पोलिसांची गैरसोय होत आहे.
( कोट )
येथील पोलीस ठाण्यात जुनी गाडी होती. ती गेल्या दीड महिन्यांपासून खराब झाल्याने ती दुरुस्तीला पाठवलेली आहे. ती गाडी लवकरच येईल, असे येथील ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांनी सांगितले.