अंबाजोगाईत विनापरवाना रॅली व डॉल्बीचा वापर प्रकरणी ७५ जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 04:10 PM2018-03-26T16:10:21+5:302018-03-26T16:10:21+5:30
रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत बेकायदेशीररित्या डीजे डॉल्बी सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी १३ आणि आदल्या दिवशी विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याप्रकरणी ७५ जणांवर अंबाजोगाई पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
अंबाजोगाई : रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत बेकायदेशीररित्या डीजे डॉल्बी सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी १३ आणि आदल्या दिवशी विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याप्रकरणी ७५ जणांवर अंबाजोगाई पोलिसांनी गुन्हे दाखल केले. यावेळी डीजे डॉल्बी सिस्टीमसहित एक टेम्पो जप्त करण्यात आला.
शहरात १६ मार्च ते २९ मार्च दरम्यान जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. असे असतानाही रामनवमीच्या आदल्या दिवशी काही तरुणांनी शहरातून विनापरवाना मोटारसायकल रॅली काढली. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास संपूर्ण शहरातून निघालेल्या या रॅलीत राजकुमार ऊर्फ बाळा गायके, गोविंद शिंपले, शुभम भारत लखेरा, अमीत जाजू, रुपेश पाथरकर, स्वप्निल धायगुडे, प्रविण भाकरे, गजानन सुरवसे, ऋषी लोमटे, ओम खंदारे, महेश अंबाड, बबलू केंद्रे, अभिमन्यू वैष्णव, आकाश होळकर, अशोक खामकर, शर्मा यांच्यासोबत अज्ञात ५० ते ६० बाईकस्वार सहभागी होते.
या दरम्यान पोलिसांनी गायके याच्याकडे परवान्याबाबत चौकशी केली असता त्याने परवाना घेतला नसल्याचे सांगितले. त्यामुळे अंबाजोगाई शहर पोलिसांनी अभिमान भालेराव यांच्या फिर्यादीवरून एकूण ७५ जणांवर मुंबई पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला.
बेकायदेशीर डीजे डॉल्बीचा वापर
रामनवमी निमित्त मोठी शोभायात्रा निघाली होती. या मिरवणुकीत पूर्णवेळ बेकायदेशीर डीजे डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यात आला. सायंकाळी ६ वाजता पाटील चौकातून मिरवणूक सुरु झाल्यापासून एका टेंपोवर (एमएच २३ - २१०१) लादलेली डॉल्बी सिस्टीम आवाज मर्यादेचे उल्लंघन करून मिरवणूक संपेपर्यंत सुरु होती. यावेळी पोलिसांनी टेंपोचालक दीपक सुधीर जाधव यास हटकले असता त्याने सदरील सिस्टीम सतीश उर्फ बबलू उत्तमराव केंद्रे याच्या मालकीची असल्याचे सांगितले. रात्री १० वाजताची मुदत उलटूनही कर्कश्श आवाजात डॉल्बी सुरूच होती. या प्रकरणी सहा. फौजदार गजानन तडसे यांच्या फिर्यादीवरून वरील ११ जण आणि गाडीच्या चालक-मालकावर अंबाजोगाई शहर पोलिसात कलम १८८, २९१, ३४ आणि म.पो. का. कलम १३१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. यावली डीजे डॉल्बी सिस्टीमसहित टेंपो जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तडसे करत आहेत.