स्वारातीमध्ये म्युकरमायकोसिसच्या ७७ शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:42+5:302021-06-05T04:24:42+5:30
पडते कमतरता अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : कोविडनंतर आढळून येणाऱ्या म्युकरमायकोसिस या नव्या आजाराच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात अंबाजोगाईचे स्वामी रामानंद ...
पडते कमतरता
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई :
कोविडनंतर आढळून येणाऱ्या म्युकरमायकोसिस या नव्या आजाराच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय मराठवाड्यात अव्वल ठरले असून आतापर्यंत ७७ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून रिकव्हरी रेटही अत्यंत चांगला असल्याची माहिती स्वारातीचे कान-कान-घसा विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे यांनी दिली.
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात म्युकरमायकोसिसवर उपचारासाठी बीड जिल्ह्यातील रुग्णांसोबतच शेजारील लातूर, उस्मानाबाद, जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक रुग्ण येत आहेत.
स्वाराती रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करून घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याची पुष्टी डॉ. देशपांडे यांनी दिली. आजपर्यंत या रुग्णालयात नाक-कान-घसा विभागाच्या वतीने ७७ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून सर्व रुग्णांचा रिकव्हरी रेटही अत्यंत चांगला आहे. सध्या स्वाराती रुग्णालयातील नाक-कान-घसा विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांना दररोज बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या रुग्णांची निवड करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया कराव्या लागतात. सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे सर्व डॉक्टर रुग्णांची काळजी घेण्यात व्यस्त असतात. म्युकरमायकोसिसच्या ७७ रुग्णांवर केलेल्या शस्त्रक्रियेनंतर आजपर्यंत फक्त २ रुग्णांचा मृत्यू झाला असून बाकीचे अनेक रुग्ण शस्त्रक्रियेनंतरचे औषधोपचार करून घरी पाठवण्यात आले आहेत. तर बाकी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रियेनंतर लागणाऱ्या इंजेक्शनचा मुबलक प्रमाणावर पुरवठा झाला तर रुग्णांना लवकर घरी पाठवण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांचा वाढतोय मुक्काम
म्युकरमायकोसिसच्या एका ऑपरेशनसाठी नाक-कान-घसा विभागाचे चार प्रशिक्षित डॉक्टर, भूलतज्ज्ञ विभागाचे डॉक्टर, प्रशिक्षित परिचारिका व इतर स्टाफ लागतो. या म्युकरमायकोसिसच्या आजाराचे एक ऑपरेशन करण्यासाठी किमान चार तास लागतात. म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा सध्या तुटवडा असून इंजक्शन वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांचा रुग्णालयातील मुक्काम वाढत आहे.
इंजेक्शनचा त्वरित पुरवठा करा
म्युकरमायकोसिस या आजारावर प्रभावी उपचार ठरणाऱ्या एम्पोथेरेसीन बी लीपोसोमाल ५० एमजी या इंजेक्शनचा स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयास तात्काळ पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचानालय व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्रालयाकडे केली आहे.
या संदर्भात आ. मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचनालयाचे मंत्री अमित देशमुख आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले आहे.
एका रुग्णाला ६ तर दररोज लागतात ३०० इंजेक्शन
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिस या गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराचे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. सदर आजारासाठी लागणारे एम्पोथेरेसीन बी लीपोसोमाल ५० एमजी हे इंजेक्शन एका रुग्णासाठी प्रत्येक दिवशी सहा लागतात. स्वा.रा.ती. रुग्णालयात सध्या रुग्णांना रोज ३०० ते ३५० इंजेक्शन लागतात.