पतीपाठोपाठ ८ दिवसांत पत्नीचीही आत्महत्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:13 AM2018-11-04T00:13:25+5:302018-11-04T00:15:47+5:30
घरच्यांचा विरोध डावलून तीन वर्षापूर्वीच त्या दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र, आठ दिवसांपूर्वी पतीने जाळून घेऊन आत्महत्या केली. पतीचा विरह सहन न झाल्याने पत्नीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : घरच्यांचा विरोध डावलून तीन वर्षापूर्वीच त्या दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र, आठ दिवसांपूर्वी पतीने जाळून घेऊन आत्महत्या केली. पतीचा विरह सहन न झाल्याने पत्नीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारात शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली. वेदना असह्य झाल्यानंतर ज्वालांनी वेढलेले शरीर घेऊन त्या महिलेने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्या अंगावर चादर आणि माती टाकून आग विझवली. परंतु, तोपर्यंत ती महिला ९५ टक्के भाजली होती. शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.
माया अमोल अडागळे (वय २५, रा. नेकनूर, ता. बीड) असे जळीत महिलेचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील माया हिचा नेकनूर येथील अमोल अडागळे याच्यासोबत तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. घरातील लोकांचा विरोध झुगारून त्यांनी पळून जाऊन तुळजापूर येथे लग्न केले होते. लग्नानंतर ते बीडमधील शाहूनगर भागात राहू लागले.
मागील आठवड्यात अमोलने स्वत:च्या गावाकडे असताना जाळून घेतले. उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात त्याचा २८ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला. अमोलच्या मृत्यूने मायाच्या मनावर खोल आघात केला. ज्या वार्डात पतीने प्राण सोडले त्याच ठिकाणी मी अंतिम श्वास घेणार, असे ती नातेवाईकांना बोलून दाखवू लागली.
परंतु, दु:खावेगाने ती असे बोलत असावी, असे नातेवाईकांना वाटले. अखेर पतीचा विरह असह्य झालेल्या मायाने शुक्रवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालय गाठले. रात्री ८.४५ वाजता तिने ओपीडीच्या जवळ असलेल्या वडाच्या झाडाखाली सोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल स्वत:वर ओतून पेटवून घेतले.
त्यानंतर वेदना असह्य झाल्याने ती किंचाळत रुग्णालयात धावली. तोपर्यंत तिला ज्वालांनी पूर्णपणे वेढलेले होते. रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक यांना नेमका काय प्रकार सुरु आहे हे क्षणभर कळालेच नाही. नंतर ताबडतोब त्यांनी स्वत:ला सावरत मायाच्या अंगावर चादर आणि माती टाकून आग विझवली. परंतु, तोपर्यंत ती ९५ टक्क्यांपेक्षाही अधिक भाजली होती. तातडीने तिला जळीत कक्षात हलविण्यात आले. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
अखेर, पतीचा ज्या वार्डात मृत्यू झाला होता त्याच वार्डात शनिवारी सकाळी मायाने देखील अंतिम श्वास घेतला आणि एका प्रेमविवाहाची दुर्दैवी अखेर झाली. बीड शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.
क्षुल्लक कारणाने आयुष्याची राखरांगोळी
मागील आठवड्यात एके दिवशी सकाळी अमोलने स्वत:च्या हाताने मायासाठी खिचडी तयार केली होती. परंतु, पोट दुखत असल्याने मायाने ती खिचडी खाण्यास नकार दिला. ही गोष्ट मनाला लागल्याने अमोलने स्वत:ला पेटवून घेतले होते अशी माहिती समोर आली आहे. अमोलला वाचविण्याच्या प्रयत्नात मायाचे देखील हात भाजले होते. उपचारानंतर तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. अगदी छोटीशी गोष्ट एवढे गंभीर रूप धारण करेल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. अमोलचा विरह तिला सहन होत नव्हता. अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले. मायाची कथा जाणून तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी देखील हळहळ व्यक्त करत होते.