पिंपळ्यात विषबाधेने ८ शेळ्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:41 AM2019-01-14T00:41:28+5:302019-01-14T00:42:56+5:30
पिंपळा (ता. आष्टी) येथील शेतकरी शेळ्यांचा कळप घेऊन चारण्यासाठी शेतात गेला. यावेळी विषारी औषध टाकलेले पिठाचे गोळे खाल्ल्याने ८ शेळ्या दगावल्या तर ३ मृत्यूशी झुंज देत असल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : पिंपळा (ता. आष्टी) येथील शेतकरी शेळ्यांचा कळप घेऊन चारण्यासाठी शेतात गेला. यावेळी विषारी औषध टाकलेले पिठाचे गोळे खाल्ल्याने ८ शेळ्या दगावल्या तर ३ मृत्यूशी झुंज देत असल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
पिंपळा येथील शेतकरी मितीन जनार्दन चव्हाण यांच्याकडे ३२ शेळ्या असून, चारा उपलब्ध नसल्याने शेतात मिळेल तिथे ते चारण्यासाठी गेले होते. नितीन म्हेत्रे यांच्या शेतात चरत असताना तेथे टाकलेले पिठाचे विषारी औषध खाल्याने यातील ८ शेळ्या जागीच दगावल्या. तर ३ श्ेळ्या मृत्यूशी झुंज देत आहे. दुष्काळात केवळ चारा नसल्याने त्यांच्या नशिबी तेरावा महिना आला आहे. अंदाजे लाखभर रूपये किंमतीच्या मोठ्या शेळ्या दगावल्या आहेत. या घटनेनंतर नुकसान भरपाई मिळावी यासाठी अख्खं कुटुंब हंबरडा फोडत होते.
शवविच्छेदनासाठी टोलवाटोलवी
मितीन चव्हाण यांच्या शेळ्या विषबाधेने रविवारी दुपारी दगावल्याचे येथील पशुवैद्यकीय अधिकारी अनिकेत म्हसे यांना फोनवर सांगूनही देखील ‘मी नगरला आहे, उद्या सकाळी येतो’ असे म्हणत घटनेचे कसलेच गांभीर्य न घेता टोलवाटोलवी केली. त्यामुळे वरिष्ठांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पँथर जिल्हाध्यक्ष रूपेश बोराडे यांनी केली.
वचक नसल्याने शेतकरी त्रस्त
आष्टी तालुक्यात दोन आमदार, एक जि.प. अध्यक्ष, एक महिला बालकल्याण सभापती, सात जि.प. सदस्य, पं.स.चे चौदा सदस्य व इतर अनेक राजकीय पदाधिकारी असताना शासकीय अधिकारी, कर्मचाºयांवर कसलाच वचक नसल्याने शेतकरी वर्गाला अडचणींना सामोरे जावे लागते.