धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 04:00 PM2021-12-16T16:00:33+5:302021-12-16T16:04:54+5:30

Kirit Somaiya Vs Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून १० वर्षापूर्वी  ८३ कोटी रूपये  भागभांडवल म्हणून जमा केले. आज दहा वर्षे लोटली  तरीही साखर कारखान्याची उभारणी झाली नाही.

83 crore looted from farmers by Dhananjay Munde; Allegations of Kirit Somaiya | धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

googlenewsNext

अंबाजोगाई-: बीड जिल्ह्याचे पालकमंत्री  धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी साखर कारखान्याच्या नावावर शेतकर्‍यांची ८३ कोटी रूपयांची लुट केली. या लुटीसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी घेतल्या. तर ज्यांनी जमिनी दिल्या नाहीत अशा मयत व्यक्तींच्या नावानेही खोटी स्वाक्षरी केली. या सर्व बाबींचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या सर्व घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आपण ईडीकडे केली आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी अंबाजोगाई येथे  आयोजित पत्रकार परिषदेत केला.

डॉ.किरीट सोमय्या गुरूवारी सकाळी अंबाजोगाईत दाखल झाले. त्यांनी नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सभागृहात कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यास उपस्थिती दर्शविली. त्यानंतर ते पुस येथील जगमित्र साखर कारखान्याच्या परिसराला भेट दिली. या नंतर त्यांनी बर्दापुर पोलिस स्टेशनमध्ये जावून या प्रकरणाचा तपास प्रामाणिकपणे झाला पाहिले अशी मागणी केली. त्यानंतर ते अंबाजोगाईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

सोमय्या म्हणाले की, राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून १० वर्षापूर्वी  ८३ कोटी रूपये  भागभांडवल म्हणून जमा केले. आज दहा वर्षे लोटली  तरीही साखर कारखान्याची उभारणी झाली नाही. हा सर्व पैसा, जमीन कुठे गेली? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. मुंडे यांनी या जमिनी घेताना मृत व्यक्तीच्या नावाने स्वाक्षरी केल्याची तक्रार दाखल आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने चार दिवसापुर्वीच दिले आहेत. तर आपण ही या घोटाळ्या बाबत ईडीकडे पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे. ठाकरे व पवार यांचे पोलिस खाते आता कशा पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करते? ही मी पाहणार आहे. मुंडे ज्या मतदार संघातील आहेत.त्याच हद्दीत पोलीस ठाणे असल्याने होणाऱ्या पोलीस तपासा बाबत आपण राज्याचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या सरकारच्या काळात दिवसेंदिवस भ्रष्टाचार व घोटाळे यांची मालिका सुरूच आहे. आलीबाबा व चाळीस चोर अशा या सरकारमधील काही मंत्री जेलमध्ये, काही मंत्री हॉस्पीटलमध्ये तर काहीजण बेलवर आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ते स्वतःच घोटाळे व भ्रष्टाचार करत असल्याने त्यांचे मंत्रीमंडळही याच कामात व्यस्त आहेत. महाराष्ट्रात घोटाळे बाजांजी मालिका सुरूच आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार, हसन मुश्रीफ, खा.भावना गवळी, अर्जुन खोतकर, धनंजय मुंडे, प्रताप सरनाईक,अनिल परब, संजय राऊत, नवाब मलिक या सर्व लोकांचे घोटाळे आपण बाहेर काढले. यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणला. राज्यातील साडेबारा कोटी जनता, शेतकरी, विविध समस्यांनी त्रस्त असताना आघाडी सरकारमधील मंत्र्यांची जनतेकडून लुट सुरूच आहे. हे राज्य भ्रष्टाचार युक्त असून ते भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी माझी लढाई सुरूच राहील असे सोमय्या यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस आ.नमिता मुंदडा,अक्षय मुंदडा,भाजपा चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,प्रवक्ते राम कुलकणी,भाजपा चे तालुका अध्यक्ष अच्युत गंगणे उपस्थित होते.

‘ईनको मिर्ची लगी तो मै क्या करू?’
धनंजय मुंडे यांच्या साखर कारखान्यातील घोटाळा उघड करण्यासाठी मी अंबाजोगाईला निघालो असताना मला सोशल मिडीया व विविध माध्यमातून धमक्या येवू लागल्या. अंबाजोगाईत आल्यानंतर तुमचं स्वागत मिर्ची पावडरने केले जाईल अशा धमक्या दिल्या. अशा धमक्यांना आपण भिक घालत नसुन ईनको मिर्ची लगी तो मै क्या करू?  अशा शब्दात त्यांनी धमक्या देणारांची खिल्ली उडविली.

संजय राउत यांची अवस्था ‘चोर मचाये शोर’
संजय राउत ईडीची नोटीस आल्यानंतर मोठमोठ्याने आरडा ओरडा करत होते. नोटीस फाडुन टाकल्याचे नाटक त्यांनी मिडीया समोर केले. मात्र रात्रीच ईडीच्या कार्यालयात जावून 55 लाखांचा चेक देवून आले. चोरीचा माल परत केल्याने चोरी माफ होत नसते. अशी टिका राउत यांच्यावर करीत संजय राउत म्हणजे ‘चोर मचाये शोर‘ अशीच त्यांची स्थिती असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

Web Title: 83 crore looted from farmers by Dhananjay Munde; Allegations of Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.