बीडमध्ये वन महोत्सवात लावलेली ८४ टक्के झाडे जगल्याचा दावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:59 AM2018-03-23T00:59:31+5:302018-03-23T00:59:31+5:30
कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात लावलेल्या झाडांपैकी ८४ टक्के झाडे जगल्याचा दावा वन विभागाने केला आहे. यापुढेही झाडे जगविण्यासाठी टँकर, विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. हे तीन महिने झाडे जगविण्यासाठी कसरतीचे ठरणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात लावलेल्या झाडांपैकी ८४ टक्के झाडे जगल्याचा दावा वन विभागाने केला आहे. यापुढेही झाडे जगविण्यासाठी टँकर, विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. हे तीन महिने झाडे जगविण्यासाठी कसरतीचे ठरणार आहेत.
कृषी दिनानिमित्त १ ते ७ जुलै दरम्यान जिल्हाभरात वन महोत्सव सप्ताह साजरा झाला. यावर्षी जिल्ह्याला १२ लाख ८२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट वन विभागाने पूर्ण केले. शिवाय जास्तीची ५ लाख झाडेही लावली. राज्यात तिसऱ्या क्रमाकांवर बीड जिल्हा होता. लावलेली झाडे जगविण्यासंदर्भात प्रत्येक शासकीय कार्यालयासह संस्थांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी काळजी घेतल्याचे सध्यातरी कागदावरील आकड्यांवरुन पाहवयास मिळत आहे. वनविभागाने जिल्हाभरात ४२ ठिकाणी ६ लाख ८० हजार झाडे लावली होती. पैकी ६ लाख ६८ हजार झाडे जगली आहेत. दरम्यान, जुलै महिन्यात लावण्यात येणाºया रोपवाटिकेची गुरूवारी अमोल सातपुते, वनपाल दावणे यांनी पाहणी केली.
यांचा उद्दिष्टपूर्तीकडे कानाडोळा
प्रत्येक शासकीय कार्यालयास झाडे लावण्यासंदर्भात उद्दिष्ट दिले होते. मात्र, जायकवाडी पाटबंधारे विभाग, माजलगाव पाटबंधारे विभाग तसेच बीड आणि अंबाजोगाई येथील तिन्ही सार्वजनिक बांधकाम विभागाने ही उद्दिष्टपूर्ती केलीच नाही. त्यांना नोटिसाही बजावल्या होत्या. खुलाशात त्यांनी पुढच्या वर्षी अधिक झाडे लावण्याचे आश्वासन दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर यावर्षी कठोर कारवाई झाली नाही, असेही सूत्रांकडून समजते.
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
झाडे जगविण्यात ग्रामपंचायत कार्यालय कुचकामी ठरत आहे. त्यांची टक्केवारी ७१ टक्के आहे, तर कृषी विभाग, जलसंधारण, बांधकाम व नगरपालिका यांची टक्केवारी ६८ टक्के आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यात ८० टक्के झाडे जगविली आहेत.