आधीचे ८७ टक्के टार्गेट अपूर्ण; आता अठरा वर्षांवरील चौदा लाख जणांना मिळेल लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:35 AM2021-04-22T04:35:16+5:302021-04-22T04:35:16+5:30
बीड : कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा १ मेपासून सुरू होत आहे. १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस दिली जाणार आहे. ...
बीड : कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा १ मेपासून सुरू होत आहे. १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस दिली जाणार आहे. असे असले तरी अगोदरचेच ८७ टक्के उद्दिष्ट अपूर्ण आहे. लसीचा वेळेवर आणि मुबलक पुरवठा झाला असता तर जिल्ह्याचे उद्दिष्ट जवळपास ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले असते. आता चौथ्या टप्प्यात लसीचा मुबलक पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ३१ लाख आहे. पैकी ४७ टक्के लोक हे १८ ते ४५ वर्षांतील आहेत; तर १८ वर्षांवरील सर्व लोकांचा टक्का ७८ आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याचे निश्चित केले आहे. या अगोदरच ४५ वर्षांवरील लोकांना लस दिलेली आहे. त्यामुळे आता १८ ते ४५ वर्षांतील १४ लाख ५७ हजार लाभार्थ्यांना ही लस मिळणार आहे. बीडच्या आरोग्य विभागाने लसीकरणासंदर्भात नियोजन करणे सुरू केले आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासह लस उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जात असल्याचे नोडल ऑफिसर डॉ. संजय कदम यांनी सांगितले.
पहिलाच मिळेना, दुसऱ्याचे काय?
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९२ हजार लसीचे डोस प्राप्त झाले होते. त्यातील आता केवळ जवळपास पाच हजार डोस शिल्लक राहिले आहेत.
आतापर्यंत ४५ वर्षांवरील ३१ हजार ८०; तर ६० वर्षांवरील ८५ हजार ४१४ लोकांना लस देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५८ हजार ७८२ लोकांना पहिला डोस दिला असून, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या २७ हजार ८०२ एवढी आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ८६ हजार ५८४ लोकांनी कोरोना लस घेतली असून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे.
एका दिवसाचाच साठा शिल्लक
n जिल्ह्यात सध्या लसीचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात १० हजार डोस आले होते. त्याचे वितरण केेले होते; परंतु लोकांचा प्रतिसाद पाहता तेदेखील संपले आहेत.
n आता केवळ दोन-चार हजार डोस शिल्लक आहेत. आता हे केवळ एका दिवसात संपतील, अशी शक्यता वर्तविली जात असून आणखी मागणी केली आहे.
ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
n जिल्ह्यात सुरुवातीपासूनच ज्येष्ठांनी कोराेना लस घेण्यासाठी प्रतिसाद दिला. जसजसा विश्वास वाढत गेला, तसतशी लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांनी गर्दी केल्याचे दिसले. सद्य:स्थितीत लसीचा तुटवडा असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
४५ पेक्षा जास्त वयाचे १३ टक्केच लसीकरण
जिल्ह्यात ४५ पेक्षा जास्त वय असलेले जवळपास नऊ लाख लाभार्थी आहेत. त्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु आतापर्यंत केवळ १ लाख १६ हजार लोकांना लस टोचली असून याचा टक्का केवळ १३ आहे.
लसीकरण केंद्रही वाढवावे लागणार
आतापर्यंत जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह सर्व उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जवळपास ७० पेक्षा जास्त आरोग्य उपकेंद्रांमध्ये कोरोना लस दिली जात होती. तसेच काही खाजगी रुग्णालयांनाही लस देण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु आता १८ वर्षांवरील लाभार्थ्यांची संख्या १४ लाख ५७ हजार एवढी असल्याने गर्दी टाळण्यासाठी आणखी लसीकरण केंद्रे वाढवावी लागणार आहेत.