गोव्याची दारू केज मध्ये ! उत्पादन शुल्क विभागाच्या धडकेबाज कारवाई ९ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 04:29 PM2017-10-06T16:29:09+5:302017-10-06T16:49:44+5:30
केज तालुक्यातील होळ शिवारात बेकायदेशीर दारूचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती राज्य उप्तादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई कार्यालयास मिळाली होती. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्कच्या अंबाजोगाई व बीड येथील कार्यालयाने औरंगाबाद येथील भरारी पथकाच्या सहकार्याने धाडसी कारवाई करत तब्बल ८ लाख ८४ हजारांची बेकायदेशीर दारू जप्त केली.
अंबाजोगाई, (बीड) दि. ६ : केज तालुक्यातील होळ शिवारात बेकायदेशीर दारूचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती राज्य उप्तादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई कार्यालयास मिळाली होती. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्कच्या अंबाजोगाई व बीड येथील कार्यालयाने औरंगाबाद येथील भरारी पथकाच्या सहकार्याने धाडसी कारवाई करत तब्बल ८ लाख ८४ हजारांची बेकायदेशीर दारू जप्त केली. या कारवाईत एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असणाऱ्या दारूचा बेकायदेशीर साठा होळ शिवारात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अंबाजोगाई येथील कार्यालयास मिळाली होती. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक एन. के. धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई कार्यालयाचे निरीक्षक संभाजी बरगे, औरंगाबाद येथील भरारी पथकातील आनंद कांबळे, बीड येथील प्रभारी निरीक्षक ए.बी. बनकर, दुय्यम निरीक्षक हरी पाकलवाड, कर्मचारी मोरे, लोमटे, डुकरे, मस्के, जारवाल, सय्यद, काळे, पाटील, पवार, शेख, मकरंद स्वामी आदींच्या पथकाने आज शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास होळ येथील एका मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या साठा करून ठेवलेली तब्बल ८ लाख ८४ हजार ४४० रुपयांची दारू जप्त केली.
यावेळी संजय सखाराम केंद्रे यास ताब्यात घेण्यात आले असून दुपारनंतर न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाकेबाज कारवाई केल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.