बीड जिल्ह्यातून तीन टोळ्यांतील ९ गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:25 AM2019-03-30T00:25:02+5:302019-03-30T00:25:32+5:30
जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा बसावा व गुंडांपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, या हेतूने जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील एकुण ९ जणांना एका वषार्साठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. शुक्रवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या कारवाईने गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
बीड : जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा बसावा व गुंडांपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, या हेतूने जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील एकुण ९ जणांना एका वषार्साठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. शुक्रवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या कारवाईने गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
गुंडगिरी करुन दहशत निर्माण करणाऱ्या लोकांविरुध्द कायदेशीर कारवाया करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी सर्व ठाणे प्रमुखांना दिले. त्यानुसार अंबाजोगाई ग्रामीणचे उपनिरीक्षक एस.डी.भोकाणे यांनी परमेश्ववर उर्फ बाळासाहेब नारायण जाधव, जीवन मोहन अंधारे, युवराज माणिक चव्हाण व शेख मंजूर शेख यासीन (सर्व रा.घाटनांदूर ता. अंबाजोगाई) यांच्यासह उपनिरीक्षक एस.यु.जाधव यांनी शेख एजाज शेख इसाक, दगडू बापू शेरेकर, नागनाथ गोविंद लामतुरे (सर्व रा.घाटनांदूर) या दोन टोळ्यांविरुध्द मटका जुगाराचे गुन्हे असल्याने महाराष्ट्र पोलीस कायदा ५५ प्रमाण पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवले होते.
याशिवाय गेवराईचे तत्कालीन पो.नि.दिनेश आहेर यांनी मालाविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या अविनाश कल्याण धुरंधरे (रा.मादळमोही ह.मु.तेलगाव नाका, बीड) व लहू सुभाष हातागळे (रा.काळा हनुमान ठाणा, बीड) यांच्याविरुध्द प्रस्ताव तयार केला होता.
घाटनांदूरच्या प्रस्तावाची अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड यांनी तर बीडमधील प्रस्तावाची उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी चौकशी करत या लोकांना हद्दपार करण्याची शिफारस पोलीस अधीक्षकांकडे केली.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूका शांततेत पार पडाव्यात या दृष्टीने पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी तीनही टोळ्यातील नऊ जणांना बीड जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार केले आहे.