९ ऊसतोड मजूर महिलांवरच गर्भाशय शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:03 AM2019-07-19T00:03:39+5:302019-07-19T00:05:01+5:30
गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणाच्या अनुषंगाने बीड तालुक्यातील वंजारवाडी गावात आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले. यामध्ये ५६ महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले.
बीड : गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणाच्या अनुषंगाने बीड तालुक्यातील वंजारवाडी गावात आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले. यामध्ये ५६ महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले. पैकी केवळ नऊच महिला उसतोड कामगार आहेत. इतर महिला या गावातच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केवळ उसतोडणीला जाण्यासाठीच गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत, हे यावरून स्पष्ट होते.
२९१ घरे आणि एकूण १८१६ लोकसंख्या असलेल्या वंजारवाडी गावात २१५ महिला आहेत. याच गावात ५६ महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. प्रत्येक महिलेची आशा सेविकेने ‘वन टू वन’ माहिती घेतली. अर्ज भरून घेतला. यामध्ये केवळ ९ महिलाच उसतोडणीला जात असल्याचे समोर आले.
४९ महिला या उसतोड कामगार नसल्याचे दिसून आला. हाच अहवाल आरोग्य विभागाने समितीला दिला. राज्ययस्तरीय चौकशी समितीलाही या महिलांनी हीच माहिती दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
यामुळे गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया
४पिशवीची गाठ असल्याने ६, अंगावरील लाल जाणे १५, अंगावरील पांढरे जाणे १३, पोटदुखी ९, पिशवीला सूज १२, इतर १ या कारणांमुळे ५६ शस्त्रक्रिया झाल्या.
४२५ ते ३० वयोगटात १, ३५ ते ४० - ६, ४० ते ५० - २०, ५० ते ६० - १९ व ६० च्या पुढील १० महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या.
या रूग्णालयात झाल्या शस्त्रक्रिया
बीड भगवान हॉस्पीटलमध्ये सर्वाधिक २४ शस्त्रक्रिया झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्यानंतर ओस्तवाल हॉस्पिटल २, कृपाळू हॉस्पिटल ३, वीर हॉस्पिटल ५, शिरपूरकर हॉस्पिटल २, अपेक्स हॉस्पिटल १, सांगली सिव्हील हॉस्पिटल १, ग्रामीण रूग्णालय रायमोहा १, जिल्हा रूग्णालय बीड ६, लहाने हॉस्पिटल ५, धूत हॉस्पिटल २, हुबेकर हॉस्पिटल १, तिडके हॉस्पिटल १, घोळवे हॉस्पिटल २ अशा एकूण ५६ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.