रुपया खर्च न करता बांधले ३७९ बंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 11:53 PM2019-12-06T23:53:35+5:302019-12-06T23:54:52+5:30
जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून शुक्रवारी ३७९ वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आले. एक रुपयाही खर्च न करता लहान- मोठ्या ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून हे बंधारे तयार केल्याने होणारा पाण्याचा साठा भविष्यात अडचणीच्या काळात कामी येणार आहे.
बीड : जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून शुक्रवारी ३७९ वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आले. एक रुपयाही खर्च न करता लहान- मोठ्या ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून हे बंधारे तयार केल्याने होणारा पाण्याचा साठा भविष्यात अडचणीच्या काळात कामी येणार आहे. वनराई बंधाऱ्याचे हे अभियान पुढील दोन आठवडे चालणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यंदा आॅक्टोबरपर्यंत समाधानकारक आणि पुरेसा पाऊस झाल्याने नदी, ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडवून जलधारणा क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने लोकसहभागातून बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात एकाच दिवशी शुक्रवारी सकाळी निश्चित केलेल्या नदी, नाले, ओढ्याच्या ठिकाणी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी, अधिकारी कर्मचारी पोहचले. श्रमदान करत वाळू, मातीने भरलेले पोते रचून काही वेळेतच बंधारे केले. बंधाºयामुळे परिसरातील शेत, विहिरी, बोअरची पातळी वाढून याचा फायदा गावालाच होणार असल्याने ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. काही गावांमध्ये जितके शक्य होतील तितके बंधारे बांधण्यासाठी लोक तयार झाले आहेत. सध्या पाणी वाहते आहे ते अडवणे गरजेचे आहे. त्यामुळे महिला बचतगटही बंधारे बांधण्यासाठी सरसावले आहेत.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, दत्तात्रय गिरी, प्रदीप काकडे, सी. एस. केकाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, समाज कल्याण अधिकारी राजू एडके, कार्यकारी अभियंता वाघमोडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. एम. साळवे, कार्यकारी अभियंता काळे यांनी तालुका संपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले.
एक बंधारा २० हजार लिटर पाणी : साखळी बंधारे करा
एका बंधाºयातून जवळपास २० हजार लिटर पाणी साठवणूक होईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डी. बी. गिरी यांनी सांगितले. धारुर तालुक्यातील कारी येथील नदीवर मोठा बंधारा ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारल्याचे ते म्हणाले.
शिरुर कासार तालुक्यातील कान्होबाची वाडी येथे पंचायत समिती कर्मचाºयांनी तयार केलेल्या बंधाºयाची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पाहणी केली.
तालुक्यातील कामांबाबत पं. स. पदाधिकारी, ग्रामस्थ, यंत्रणेची प्रशंसा केली. सध्या वाहणारे पाणी शिवारात अडण्यासाठी पूर्ण तालुक्यात साखळी बंधारे करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सामुदायिक सहकार्याचे करा
शुक्रवारी सकाळी बीड तालुक्यातील घाटसावळी येथे ग्रामस्थ, विद्यार्थी आणि युवकांनी तयार केलेल्या वनराई बंधाºयाची पाहाणी करुन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी कौतुक केले.
असे बंधारे आणखी उद्या व दोन आठवड्यात लोकसहभागातून उभारण्यासाठी सामुदायिक सहकार्याचे आवाहन कुंभार यांनी केले.