धुळवडीला जावयाचा मानपान म्हणजे चक्क गाढवावरून मिरवणूक;९० वर्षांची आहे परंपरा, वाचा कुठे ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 07:31 PM2022-03-16T19:31:50+5:302022-03-16T19:50:08+5:30
काेरोनामुळे २०२० व २०२१ या दोन वर्षांत या परंपरेत खंड पडला. यंदा मात्र ही परंपरा पुन्हा सुरू होणार असल्याची चाहूल लागताच अनेक जावई भूमिगत झाले आहेत.
- विनोद ढोबळे
विडा (ता.केज) : जावई म्हटले की मानपान... लाड आणि सरबराई ओघाने आलीच; पण बीड जिल्ह्यात एक गाव असेही आहे जेथे धुळवडीला जावयाची चक्क गाढवावरून मिरवणूक काढली जाते. केज तालुक्यातील विडा या गावाने ९० वर्षांपासून ही परंपरा जपली आहे. कोरोना संक्रमणामुळे दोन वर्षांपासून या परंपरेत खंड पडला होता. यंदा पुन्हा ही परंपरा पूर्ववत सुरू होणार असल्याने विड्याच्या जावयांनी चांगलाच धसका घेतला आहे.
हजारावर उंबरे व सात हजार लोकसंख्येचे विडा
निजाम राजवटीत जहागीरदारीचे गाव म्हणून ओळखले जाई. तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे बाळनाथ चिंचोली (जि. लातूर) येथील मेहुणे धूलिवंदनाच्या दिवशी विड्याला आले होते. त्यांचा खास पाहुणचार केला गेला. मात्र, तेव्हा गावातील कर्त्या मंडळींनी त्यांची थट्टा मस्करी करून चक्क गाढवावर बसून सवारी काढली. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा अजूनही कायम आहे. काेरोनामुळे २०२० व २०२१ या दोन वर्षांत या परंपरेत खंड पडला. यंदा मात्र ही परंपरा पुन्हा सुरू होणार असल्याची चाहूल लागताच अनेक जावई भूमिगत झाले आहेत. रंगांची उधळण करीत हलगीच्या तालावर थिरकणारी तरुणाई व आबालवृद्धांंचा सहभाग यामुळे या परंपरेची परिसरात भलतीच उत्सुकता असते. १८ मार्च रोजी जावयाची गर्दभ मिरवणूक काढण्यासाठी गाढवापासून ते जावयापर्यंत शोधाशोध सुरू झाली आहे. गोविंद देशमुख, नारायण वाघमारे, महादेव पटाईत, शहाजी घुटे, रावसा पटाईत आदी यासाठी परिश्रम घेत आहेत.
ना वाद ना विवाद
विड्यातील या अनोख्या परंपरेला आता ९० वर्षे होत आहेत. मात्र, एकदाही भांडण-तंटे झाले नाहीत. विशेष म्हणजे गर्दभ मिरवणुकीसाठी सर्व जाती-धर्माच्या जावयांना आतापर्यंत मान मिळालेला आहे. जाती-धर्मापेक्षा तो गावचा जावई आहे ना... बस्स एवढीच एक अट असते. त्यामुळे सर्वांचा सहभाग असतो. यातून सामाजिक सलोखा व एकोपाही जपला गेला आहे.
दोन वर्षांनंतर यंदा मिरवणूक
जावयाची गाढवावरून मिरवणूक काढल्यानंतर त्यांचा मंदिरात अहेर देऊन सन्मानही केला जातो. दोन वर्षांनंतर यंदा मिरवणूक काढली जाणार असून, तरुणांमध्ये उत्साह आहे. जावयाच्या शोधासाठी दोन टीम पाठविल्या आहेत.
- सूरज पटाईत, सरपंच, विडा