कॉलगर्ल पाठविण्याचे आमिष दाखवून तरुणाला ९० हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:39 AM2021-09-15T04:39:35+5:302021-09-15T04:39:35+5:30
बीड : शहरातील एका तरुणाला त्याचा ‘आंबट शौक’ चांगलाच महागात पडला आहे. एका एस्कॉर्ट वेबसाईटला भेट दिल्यानंतर त्या तरुणाला ...
बीड : शहरातील एका तरुणाला त्याचा ‘आंबट शौक’ चांगलाच महागात पडला आहे. एका एस्कॉर्ट वेबसाईटला भेट दिल्यानंतर त्या तरुणाला एका कॉलगर्लचा फोटो पाठवण्यात आला. तिला शहरातील एका हॉटेलला पाठवतो असे सांगत त्या भामट्याने वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली त्या तरुणाकडून ९० हजार रुपये लाटले. अखेर पैसेही गेले आणि कॉलगर्लही न आल्याने फसवणूक झाल्याचे त्या तरुणाच्या लक्षात आले, त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील २४ वर्षीय तरुण सध्या शिक्षण घेत आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१२) सायंकाळी ७ वाजता त्याने एका एस्कॉर्ट वेबसाईटला भेट दिली. वेबसाईटवरून त्याला एक मोबाईल नंबर देण्यात आला. त्या मोबाईलवरून भामट्याने सुरुवातीला त्याला एका मुलीचा फोटो पाठवला. ‘तू गुगल पे वर पैसे पाठव’, मी या मुलीला बीडमधील एका हॉटेलला पाठवतो असे त्या भामट्याने सांगितले. त्या तरुणाने १० हजार रुपये पाठवले आणि हॉटेलबाहेर जाऊन थांबला पण, तिथे कोणीच नव्हते. त्यामुळे तरुणाने दिलेल्या नंबरवर पुन्हा फोन केला, तर, पुन्हा त्या भामट्याने सुरक्षा रक्कम म्हणून १० हजार, कोविड चार्जेसचे १० हजार, सुरक्षा अनामत म्हणून ४० हजार आणि हॉटेलचे २० हजार रुपये असे एकूण ९० हजार रुपये त्या तरुणाकडून जमा करून घेतले. मात्र, त्यानंतर देखील कोणतीच मुलगी तिथे न आल्याने आपली फसवणूक होत असल्याचे त्या तरुणाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने खात्याची मर्यादा संपली, मला माझी रक्कम परत करा अशी मागणी केली. त्यावर त्या भामट्याने पैसे परत पाहिजे असतील तर आणखी ५ हजार रुपये दे अशी मागणी केली. अखेर त्या वैतागलेल्या तरुणाने शिवाजीनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे करत आहेत.