बीड जिल्ह्यात ९९.५२ टक्के पेरण्या पूर्ण मात्र पावसाने ओढ दिल्याने पिकांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 06:39 PM2018-07-26T18:39:24+5:302018-07-26T18:40:58+5:30
संपूर्ण जिल्ह्यात ९९.५२ टक्के खरीप पिकांचा पेरा पूर्ण झाला आहे. परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बीड : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, मात्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे. संपूर्ण जिल्ह्यात ९९.५२ टक्के खरीप पिकांचा पेरा पूर्ण झाला आहे. परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जून महिन्यात झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर जुलै महिन्यात दमदार पावसाची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना होती. मात्र जुलै महिन्यात देखील वरूणराजाची कृपा झाली नाही. त्यामुळे अल्प पावसावर जवळपास ६ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा पूर्ण झाला आहे. मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जुलै महिनाअखेर आले तरी पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची वाढ खुंटलेलीच आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. कापूस, तूर, सोयाबीन या पिकांची मुळे जमिनीमध्ये खोलवर रूजतात. मात्र, ओलावा कमी होत असल्यामुळे वाढ खुंटून पिके सुकू लागली आहेत. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.
कृषी विभागाच्या सल्ल्याने करा उपाययोजना
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळोवेळी कृषी विभागाचा सल्ला घेऊन शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.वेळेवर तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी केली तर, पिकांची वाढ खुंटण्याचे प्रमाण व किडीचा प्रादुर्भाव रोखता येईल. तसेच पुढील आठ ते दहा दिवस पावसाने ओढ दिली तरी देखील पिके न सुकता तग धरू शकतील, असे मत बीड तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव व शिरुर तालुका कृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके यांनी व्यक्त केले. कडधान्यांपेक्षा कापूस, तूर, सोयाबीन या पिकांना पावसाची अधिक आवश्यकता असते. जमिनीतील ओल कमी झाल्यामुळे पिकांना मिळणारे आवश्यक मूलद्रव्ये कमी पडत आहेत. त्यामुळे कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने पिकांवर औषधांची फवारणी करावी.